लव्हडेल, वनिता विद्यालय विजयी
बेळगाव : बेळगाव स्पोर्टस क्लब आयोजित हनुमान चषक 16 वर्षांखालील आंतरशालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या सामन्यात वनिता विद्यालय स्कूल व लव्हडेल स्कूल यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला. अथर्व चतुर व झोया काझी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.अनगोळ येथील एसकेई प्लॅटिनियम क्रिकेट मैदानावर पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंडस अल्टमने 20 षटकांत 9 बाद 89 धावा केल्या. त्यांच्या सिद्धार्थ हेडाने 35 धावांचे योगदान दिले. लव्हडेल स्कूलतर्फे अथर्व चतुरने तीन गडी, वेदांत बजंत्रीने दोन गडी, अंशने एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लव्हडेल स्कूलने 12.3 षटकांत 2 बाद 90 धावा करून हा सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यांच्या अथर्व चतुरने 27, अंशने 29 धावांचे योगदान दिले. इंडस अल्टिमतर्फे स्वयंम चव्हाण, सिद्धार्थ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वनिता विद्यालयने 20 षटकांत 4 बाद 118 धावा केल्या. त्यांच्या झोया काझीने 29, फराज काजीने 26 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल एम. व्ही. हेरवाडकरने 17.4 षटकांत सर्वबाद 68 धावा केल्या. त्यांच्या सुजल इटगीने 19, मंथन एमने 10 धावांचे योगदान दिले.