लव्हडेल सेंट्रल, भातकांडे उपांत्यफेरीत
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत हनुमान चषक 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून लव्हडेल संघाने केएलएसचा 49 धावांनी तर गजाननराव भातकांडे संघाने केएलई इंटरनॅशनल अ चा 26 धावांनी पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. अजय लमाणी, सचिन तलवार यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.प्लॅटिनम ज्युबली टर्फ मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लव्हडेल सेंट्रल स्कूलने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 164 धावा केल्या.
त्यात अजय लमाणीने 2 षटकार, 11 चौकारांसह 88, सुरजने 3 चौकांरासह 27 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलएसचा डाव 15.4 षटकात 115 धावात आटोपला. त्यात वेदांत दुधानीने 4 चौकारासह 27, आर्यन इंगोलेने 4 चौकारांसह 17 धावा केल्या. लव्हडेतर्फे अजय लमाणीने 5 धावात 5 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात गजाननराव भातकांडेने 20 षटकात 1 गडी बाद 128 धावा केल्या. त्यात सचिन तलवारने 9 चौकारांसह 66, मोहम्मद हमजाने 2 चौकारांसह 33 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलईने 20 षटकात 6 गडी बाद 102 धावा केल्या. त्यात कौस्तुभ पाटीलने 3 चौकारांसह 40 धावा केल्या. भातकांडेतर्फे नमन दड्डीकर, शाहरूख व मीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.