दहा सावज झाले, अकरावा नको!
उच्च न्यायालयाची टिप्पणी : सतर्कता म्हणून पोलीस स्थानकात छायाचित्र प्रसिद्ध करा
बेळगाव : प्रेम करायचे, लग्न करायचे किंवा बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा आणि रक्कम उकळायची, अशी मालिकाच महिलेने सुरू केली होती. हे न्यायालयाच्या नजरेला आल्याने संबंधित महिलेच्या विरोधात गंभीर ठपका ठेवत अशी दहा प्रकरणे झाली, अकरावे नको म्हणून राज्यातील सर्व पोलीस स्थानकांमध्ये संबंधित महिलेचे छायाचित्र लावण्याची सूचना पोलीस महासंचालकांना उच्च न्यायालयाने केली आहे. या महिलेच्या फसवणुकीच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याबाबत बेळगाव न्यायालयाच्या परिसरातही जोरदार चर्चा सुरू असून आपल्या जिल्ह्यातील एखादी व्यक्ती यामध्ये अडकली आहे का? याची चाचपणी सुरू झाली आहे.
महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. एका महिलेने गेली 10 वर्षे अनेकांना फसवणूक करून त्यांना न्यायालयात खेचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 2011 ते 2021 पर्यंत या महिलेने 10 जणांवर लैंगिक अत्याचार, कौटुंबिक अत्याचार आणि घटस्फोटाचे खटले दाखल केले आहेत. लग्न करण्याचे आमिष दाखवायचे, त्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा, असे प्रकार बेंगळूर येथील उच्च न्यायालयाच्या नजरेला आले आहेत.
एखाद्या व्यक्तीला जाळ्यात पकडायचे, त्याच्याशी लग्न करायचे, त्यानंतर त्याच्या कुटुंबावर आपल्यावर अत्याचार झाले म्हणून गुन्हा दाखल करायचा, त्यांच्याकडून रक्कम उकळायची. बेंगळूर व राज्यातील इतर परिसरातील पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल करून त्या महिलेने साऱ्यांचीच झोप उडवून दिली आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन तिने सावज हेरले आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्येही त्या महिलेने सावज हेरल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
आणखी काही प्रकरणे असण्याची दाट शक्यता...
सध्या 10 प्रकरणे न्यायालयासमोर उघडकीस आली तरी आणखी काही प्रकरणे असण्याची दाट शक्यता आहे. मात्र बदनामी नको म्हणून काहीजण त्या महिलेविरोधात तक्रार करण्यास नकार देत आहेत. दरम्यान महत्त्वाचे म्हणजे चक्क एका वकिलाविरोधातही राज्य बार असोसिएशनकडे त्या महिलेने तक्रार केली आहे. एकूणच त्या महिलेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली असून न्यायालयाने दहा प्रकरणे झाली अकरावे नको म्हणून टिप्पणी दिली आहे. आता पोलीस प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहणार, हे बघावे लागणार आहे. याबाबत बुधवारी बेळगावात जोरदार चर्चा रंगली होती.