प्रेमविवाहित पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात रविवारी (६ जुलै) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास, तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली.
मृतांची नावे गोपाळ लक्ष्मण गुंड (वय ३०) आणि गायत्री गोपाळ गुंड (वय २२) अशी आहेत. दोघेही उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथील रहिवासी होते.
गोपाळ आणि गायत्री यांचा तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. गोपाळ दूध विक्रीचा व्यवसाय करीत होता. तो आपल्या आई-वडील, दोन भाऊ आणि पत्नी गायत्रीसोबत एकत्र राहत होता.
रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी गोपाळचा लहान भाऊ पंढरपूर वारीसाठी गेला होता, तर आई-वडील गावात किर्तनासाठी गेले होते. घरी केवळ गोपाळ व गायत्रीच होते. यावेळी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
विवादानंतर गोपाळने पत्नी गायत्रीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तिचा मृतदेह एका खोलीत आढळून आला. त्यानंतर गोपाळने दुसऱ्या खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
रात्री उशिरा वडील, आई व भाऊ घरी आल्यानंतर ही दुर्दैवी घटना त्यांच्या लक्षात आली. तात्काळ पोलीस पाटील पांडुरंग कुमार यांना कळविण्यात आले. त्यांनी ही माहिती तालुका पोलीस ठाण्याला दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि दोघांना पुढील तपासासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले.