चौदा वेळा लागली लॉटरी
आयुष्यात एकदा तरी भक्कम रकमेची लॉटरी लागावी आणि जीवनातील सर्व आर्थिक समस्या एका तडाख्यात सुटाव्यात, अशी जवळपास प्रत्येकाची इच्छा असते, हे आपल्याला माहित आहे. एकदा तरी अशा प्रकारे भाग्य फळफळावे, या इच्छेपोटी अनेक लोक आयुष्यभर लॉटरीचे तिकीट काढत राहतात पण त्यांना लॉटरी लागत नाही. तथापि, रुमानिया नामक देशात स्टीफन मँडल नामक एक गणिततज्ञ होते, ज्यांना तब्बल चौदा वेळा लॉटरी लागली होती. या लॉटरीच्या रकमेतून त्यांना प्रचंड श्रीमंती आणि वैभवाची प्राप्ती झालेली होती.
लॉटरी हा भाग्याचा खेळ मानला जातो. तथापि, मँडल यांच्या संदर्भात तसे नव्हते. त्यांनी त्यांच्या उपजत गाणिती बुद्धीमत्तेचा उपयोग करुन एक सूत्र निर्माण केले होते. या सूत्रानुसार ते संख्यांची जुळवाजुळव करीत आणि विशिष्ट क्रमांकाचे लॉटरीचे तिकीट काढत असत. अनेकदा त्यांचे अनुमान अचूक येत असे आणि त्यांना लॉटरीतून धनलाभ होत असे. त्यांचे हे सूत्र विशिष्ट प्रकारच्या लॉटऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असे. हे सूत्र ‘परम्युटेशन-काँबिनेशन’च्या तत्वावरचे होते.
आपल्या या सूत्राच्या आधारे त्यांनी एक लॉटरी सिंडिकेट निर्माण केले होते. त्यामुळे त्यांच्यावर तपास अधिकाऱ्यांची दृष्टी गेली. तथापि, मँडल यांचे सूत्र पूर्णत: कायदेशीर असल्याने त्यांच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही. तथापि, त्यांना प्रदीर्घ काळपर्यंत कायदेशीर आणि न्यायालयीन कारवाईला तोंड द्यावे लागल्याने लॉटऱ्यांमधून कमावलेले धन यात पूर्णत: खर्च झाले आणि अखेरीस त्यांनी स्वत:चे दिवाळे निघाल्याची घोषणा केली. आज ते 90 वर्षांचे आहेत. त्यांचे निश्चित लॉटरी जिंकून देणारे सूत्रही चर्चेत आहे. अनेकांचे त्यावर संशोधनही होत आहे.