गवसल्या 300 वर्षांपूर्वीच्या सुवर्णमुद्रा
अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांताच्या सागरात ‘क्वीन ज्वेल्स’ नामक एका कंपनीला 300 वर्षांपूवीच्या सुवर्णमुद्रांचा (सोन्याच्या नाण्यांचा) साठा गवसला आहे. या सुवर्णमुद्रांचे आजचे मूल्य साधारणत: 8 कोटी 30 लाख रुपये इतकी आहे. सापडलेल्या नाण्यांची संख्या एक हजाराहून अधिक असून त्यांच्यामध्ये काही चांदीची नाणीही मिळाली आहेत. या नाण्यांवर, ती ज्यावेळी पाडली गेली, तो दिनांकही कोरलेला आहे, अशी माहिती या कंपनीने काही दिवसांपूर्वी दिली आहे.
ही स्पेन या देशात निर्माण करण्यात आलेली नाणी आहेत, हे त्यांचा तपास केला असता स्पष्ट झाले. आहे. त्यावेळी स्पेन देशाने दक्षिण अमेरिकेत आपल्या वसाहती निर्माण करण्यास प्रारंभ केला होता. या नाण्यांवर त्याकाळी स्पेनच्या वसाहती असणाऱ्या बोलिव्हिया, मेक्सिको आणि पेरु या देशांची चिन्हे आहेत. ही नाणी इसवीसन 1715 मध्ये दक्षिण अमेरिकेतून स्पेनला नेण्यासाठी जहाजावर ठेवण्यात आली होती. तथापि, वादळामुळे जहाज बुडाल्याने ही नाणीही समुद्राच्या तळाशी गेली. तथापि, सोने आणि चांदी हे टिकावू धातू असल्याने समुद्राच्या खाऱ्या पाण्यातही त्यांना गंज चढला नाही. त्यामुळे आज 300 वर्षांहून अधिक काळ ही नाणी समुद्राच्या तळाशी सुरक्षित राहिली आहेत. आता या कंपनीला ती सापडल्याने एक ऐतिहासिक ठेवा अमेरिकेच्या हाती लागला आहे. या नाण्यांवर आता अधिक संशोधन होत असून त्यामुळे गतकाळावर मोठा प्रकाश पडणार आहे.
फ्लोरिडा प्रांताच्या कायद्यानुसार समुद्रात सापडलेली धनसंपत्ती ही प्रांताच्या मालकीची असते. या कायद्यानुसार या प्रांताच्या प्रशासनाने ही नाणी आता आपल्या ताब्यात घेतली आहेत. ज्या कंपनीने या नाण्यांचा शोध लावला, त्या कंपनीला तिचे शुल्क किंवा कमिशन दिले जाणार आहे. तसेच या नाण्यांपैकी 20 टक्के नाणी लोकांच्या पाहण्याकरीता, किंवा प्रदर्शनात ठेवण्यासाठी दिली जाणार आहेत. तसेच याच 20 टक्के नाण्यांमधील काही नाणी संशोधनासाठी उपयोगात आणली जाणार आहेत. समुद्र तळाशी सोन्याचा साठा सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. बुडालेल्या प्राचीन जहाजांमधून अनेकदा अशी नाणी किंवा संपत्ती जप्त केली गेली आहे. सध्या या नाण्यांची चर्चा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात होत आहे.