मुसळधार पावसामुळे लाखोंचे नुकसान
विजापूर परिसरातील 20 हून अधिक घरांमध्ये पाणी
वार्ताहर /विजापूर
शहरासह जिल्हाभरात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. याशिवाय इब्राहिम नगरातील 20 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली. याशिवाय 1 गाय, 2 शेळ्यांचा मृत्यू तर अनेकांच्या घरांचे नुकसान झाल्याने गुरुवारचा पाऊस लाखो रुपयांचे नुकसान करणारा ठरल्याचे स्पष्ट झाले. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने धान्य, खाद्यपदार्थांसह अनेक घरातील साहित्य वाहून गेले. सोलापूर रोडवरील पोलीस निवास संकुलातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने रात्री 2 वाजण्याच्या सुमारास जेसीबीने जमीन खोदून पाणी वाहून जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे मोठे नुकसान टळले. वज्र हनुमान नगर व इब्राहिमपूर रेल्वे स्थानकासमोरील सखल भागातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.सध्या डोणी नदी दुथडी भरून वाहत असून परिसरातील भात पिके वाहून गेली आहेत.अद्याप मोठ्या पावसाला सुरुवात होण्याआधीच धोकादायक स्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या गावांतील लोकांना पुराची भीती वाटू लागली आहे. कोल्हार तालुक्यातील कौलगी गावातील हणमंत सिद्धप्पा छालवाडी यांच्या शेतातील गायीचा वीज पडल्याने मृत्यू झाला. निदगुंडी तालुक्यातील हलिहाळ गावात सबन्ना बसनगौडा बिरादर यांच्या 2 शेळ्यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. तसेच शिवसंगप्पा रायप्पा बेवीनमट्टी हे वीज पडून जखमी झाले. याशिवाय कोल्हार तालुक्यातील 3 घरे व बसवन बागेवाडी तालुक्यातील 4 तर निडगुंदी, तालिकोट, मुद्देबिहाळ, सिंदगी या तालुक्यांमध्ये अनेक घरांची अंशत: पडझड झाली आहे.