महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीकृष्णाला भक्तांच्या प्रेमाचे ओझे होते

06:30 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

नाथमहाराज सांगतात, संसारभयाने त्रासून जाऊन जे श्रीकृष्णाला शरण जातात त्यांचे भवभय हरण करण्यासाठी श्रीकृष्णाने वेदार्थाचे मंथन करून त्यातील ज्ञानविज्ञानाचे सार काढले आहे. जे त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे वर्तन करतील त्यांचा उद्धार होईल. श्रीकृष्णापूर्वी असे सार काढण्याचा प्रयत्न कित्येक ज्ञानी, विद्वानांनी केला पण त्यांना ते शक्य न झाल्याने ते शिणून गेले. विद्वानांनी वेदांचे सार काढण्यासाठी जेव्हा प्रयत्न केले तेव्हा ईश्वराचे मनोगताचे त्यांना नीट आकलन न होऊ शकल्याने त्यांचे प्रयत्न फोल ठरले. त्यामुळे वेदांना अतिशय वाईट वाटले पण जेव्हा वेदांचा आदिकर्ता असलेल्या श्रीकृष्णाने वेदांचे सार काढले, ते एकदम अचूक असल्याने वेदांना कोणतीही व्यथा जाणवली नाही. त्याबद्दल एक चपखल उदाहरण देताना नाथमहाराज सांगतात, जेव्हा गायीचे दुध गवळी लोक काढतात तेव्हा गायीला वेदना होत असतात परंतु जेव्हा वासरू गायीचे दुध पीत असते तेव्हा गायीला कोणतीही व्यथा जाणवत नाही. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने स्वत: वेदांचे अचूक सार काढल्याने वेदांना लेशभरही दु:ख वाटले नाही. ह्याप्रमाणे स्वत: श्रीकृष्णनाथाने वेदार्थाचे ज्ञानविज्ञानसारामृत काढून भक्तांच्या हाती देऊन त्यांच्यावर कृपा केली. ज्याप्रमाणे फुलपाखरू हळूवारपणे फुलातील मकरंद काढते त्याप्रमाणे श्रीकृष्णाने हळुवारपणे वेदार्थाचे शुद्ध सार काढले.

Advertisement

भक्तकृपाळू श्रीकृष्णनाथाने वेदसारामृत काढून स्वत:च्या भक्तांना दिले आणि त्यांना निर्भय बनवले. हे वेदसारामृत भक्ताला देऊन त्यांनी त्याचे जन्ममरण आणि भवभय संपूर्णपणे निर्दाळून टाकले. जगाच्या निर्मितीच्यामागे ज्या मायेची प्रमुख भूमिका असते त्या मायेची निर्मिती स्वत: श्रीकृष्णाने केलेली आहे. त्यामुळे ती त्याच्या नजरेखाली काम करते. जे श्रीकृष्णाचे अनन्य भक्त असतात त्यांना श्रीकृष्ण त्याच्या ताब्यात असलेल्या मायेच्या बाधेपासून दूर ठेवतो. मायेच्या बाधेमुळे माणसाला मी म्हणजे हा देह असे वाटते तसेच समोर दिसणारी दुनिया खरी आहे, असेही तो मानत असतो पण श्रीकृष्णाने काढलेल्या वेदसारामृताच्या सेवनाने भक्ताला आपण आत्मस्वरूप असून समोर दिसणारी दुनिया हा केवळ भास आहे हे लक्षात येते आणि त्यामुळे तो मायेने निर्माण केलेल्या मोह आणि आसक्ती ह्या जोखडातून मुक्त होतो. श्रीकृष्णाचे मूळ स्वरूप सच्चिदानंदघन असे आहे. हा श्रीकृष्ण सर्वांना वरिष्ठ असून वंद्य आहे. त्याच्याइतका भक्तावर कृपा करणारा अन्य कुणी नसल्याने त्याला काया, वाचा आणि मनाने सर्वार्थाने अनन्य शरण जाऊन वंदन करावे.

श्रीकृष्णाचे महात्म्य सांगून झाल्यावर पुढे नाथमहाराज उद्धवाचे महात्म्य सांगत आहेत. ते म्हणतात, श्रीकृष्णनाथाकडून भक्तीसारामृताचे भरभरून सेवन करून उद्धवाला परमनिर्वाण प्राप्त झाले. खरोखरच भगवद्भजन सगळ्यात श्रेष्ठ असून ते करणाऱ्या भक्तांच्या ऋणात श्रीकृष्ण असतो. त्याला भक्तांच्या प्रेमाचे ओझे होते आणि ते अंशत: फेडावे म्हणून तो त्यांच्या आधीन होतो. भक्तांवर त्याचे अतोनात प्रेम असते. त्यांची खुण म्हणजे निजधामाला जाताना त्याला इतर कुणाचीही आठवण न होता श्रेष्ठ भक्त विदुराची आठवण झाली ती सुद्धा का, तर त्याला आत्मज्ञान द्यायचे राहिले म्हणून. शेवटी त्यासाठी मैत्रेयाला त्याने आत्मज्ञान देऊ केले आणि त्याला विदुराना उपदेश करण्याची आज्ञा केली. भक्तांच्या जे जे मनात असते ते ते तो पुरवतो. भक्तावर तो करत असलेल्या कृपेला कोणतीही सीमा नसते. ह्याचा पुरावा म्हणजे शेवटी तो त्यांना स्वत:चे पदही देऊ करतो. आता उद्धवाचंच पहा ना, तो निजधामाला निघाला असताना उद्धवाने त्याला कोणताही प्रश्न विचारला नव्हता तरीही हे परमामृताचे कथन त्याने केले.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article