For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामदूत हनुमान...

06:47 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
रामदूत हनुमान
Advertisement

रामापर्यंत नेमकेपणाने पोहोचण्याचा मार्ग म्हणजे हनुमंत, याचं कारण म्हणजे हनुमंताचे गुणधर्म. ते पाहायला लागलं की आपल्या लक्षात येतं आमच्या आचरणात जर हे सगळे गुण आणता आले तर किती बरं झालं असतं? वानरा पासून नर होईपर्यंतचा प्रवास आमच्यातले अनेक चांगले गुण संपवून गेला. आम्ही काय केलं पाहिजे? कसं वागलं पाहिजे? याचा विधीनिषेधच आमच्यात उरला नाही. आम्ही स्वत:ची ओळख करून देताना आपण स्वयंभू असल्यासारखं सांगत राहतो, त्यात आई-वडिलांचे उपकार देखील मानण्याचे कष्ट घेत नाही. हनुमंत मात्र स्वत:ला अंजनीतनय म्हणतांना स्वत:च्या तपस्वी आईला कधीच विसरत नाही. अगदी रावण वधानंतर श्री रामांनी अनेक सरदारांना पुरस्कृत केलं, भेटी दिल्या, वस्त्रालंकार दिले, राज्यामधली विविध पदं देखील दिली, त्याच वेळी हनुमंताला देखील त्यांनी विचारलं तुला काही हवे की नको? तेव्हा हनुमंताने क्षणाचाही विलंब न करता मागीतले.... माझ्या आईला तुम्ही दर्शन द्यावं एवढीच माझी इच्छा आहे.

Advertisement

अर्थातच रामांनी ती लगेचच मान्य केली. ही मागणी पूर्ण करताना अयोध्येला परत जाताना पुष्पक विमानात बसल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी अंजनेय पर्वतावर विमान उतरवलं. त्या ठिकाणी अंजनी माता अगदी मरणासन्न अवस्थेला पोहोचलेली होती. फक्त रामाच्या भेटीची आस तिच्या डोळ्यात राहिली होती. आता तिथे राम आल्यानंतर अंजनीने पाद्य पूजा करण्याची इच्छा व्यक्त केली. रामायणामध्ये फक्त दोनदाच परम भक्तांकडून रामांची पाद्य पूजा झालेली दिसते. एक म्हणजे गुहा नावाड्याकडून आणि दुसरी म्हणजे अंजनीकडून. ही पाद्यपूजा झाल्यानंतर हनुमंत निघणार एवढ्यात अंजनीने हनुमंताला प्रश्न विचारला रावणाला कोणी मारलं? अर्थातच रामाला या प्रश्नाचे उत्तर माहिती असल्यामुळे राम पुढे सरसावले आणि त्यांनी सांगितलं की रावणाचा वध माझ्या हातून होणार असल्यामुळे मी त्याला मारले. पण त्यासाठी लागणारी सगळी मदत मला हनुमंताने केली म्हणून खऱ्या अर्थाने अप्रत्यक्षरीत्या हनुमंतानेच त्याला मारले मी फक्त निमित्त ठरलो. असा हा हनुमंत आम्हाला निरहंकारीपणाचा धडादेखील शिकवतो. सीतेला भेटायला आल्यावर मी स्वत: कोण याची फुशारकी न मारता मी प्रभू रामांचा सेवक म्हणवतो. रावणाने हनुमंताला दोरीने बांधल्यावर त्याला ठणकावून सांगतो तू मला कितीही दोऱ्या बांधल्या तरी उपयोग नाही कारण मी रामनामाच्या दोराने बांधलो गेलोय, ज्यातून मला सर्व बंधन तोडता आलीयेत. त्यात तुझ्या या दोरीचा काय उपयोग? या बंधनासकट मला भगवंत उचलून घेतील कारण ते सतत माझ्याबरोबर असतात हा दृढ विश्वास त्याच्याजवळ होता. सूरदासांना देखील अनेक लोक म्हणायचे कशासाठी एवढा पडत धडपडत तू देवळात येतोस तुला तर काही डोळ्यांनी देव दिसत नाही. तो म्हणायचा...पण मला बघणारा देव तर मला बघत असतोच ना, त्याला डोळे आहेतच. त्याच्यामुळे मी आंधळा असलो म्हणून काय झालं, ही दृढ भक्ती ज्याच्याजवळ असते तिथे अहंकार पूर्ण नाहीसा झालेला असतो. हेच या दोघांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं. श्रीराम मात्र हनुमंताला संकटमोचक म्हणतात. देवावर आलेलं संकटसुद्धा ज्यांनी निवारण केलं तो हा हनुमंत म्हणून रामाला तो जास्त जवळचा वाटतो. सामान्य माणसाला देखील तो संकट मुक्त करतोच, फक्त आम्ही त्याच्या दारात गेलं पाहिजे. संकटाशी सामना करायचा असतो, दोन हात करायचे असतात, ह्याचं नेमकं उदाहरण म्हणजे हनुमंत. ज्याचा सहवास वायूच्या रूपाने आमच्या शरीरातसुद्धा 24 तास असतोच. अशा हनुमंताची म्हणजे श्वासांची जाणीव ठेवून आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवून आम्ही प्रत्येक संकटाला तोंड दिलं पाहिजे असं जेव्हा व्हायला लागेल आम्ही जेव्हा आमचं कर्तुत्व पार पाडायला लागू त्यावेळेला आम्हाला हनुमंत विजयी करतोच आणि आम्हा सर्वांना असा विजय करणारा हनुमंत मात्र चिरंजीव ठरतो. कारण हनुमंत म्हणजे प्राण, हनुमंत म्हणजे शक्ती, हनुमंत म्हणजे कर्म आणि सफलता अशा या हनुमंताचे गुणगान रोजच करायला हवे.

मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतांम वरिष्ठम, वातात्मज वानरयुथमुख्यं, श्री रामदूतम शरणं प्रपद्ये...

Advertisement

जय हनुमान.

Advertisement
Tags :

.