For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणपती बाप्पा विराजमान...!

11:56 AM Aug 28, 2025 IST | Radhika Patil
गणपती बाप्पा विराजमान
Advertisement
सातारा :
विघ्नहर्ता, गजानना, गणपती बाप्पा, विनायका, मोरया म्हणत लाडक्या बाप्पांचे आगमन उत्साही वातावरणात सातारा शहरासह जिह्यात झाले. जिह्यात तब्बल 2 लाख 54 हजार 439 घरगुती गणपती, 7 हजार 800 गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिह्यातील 1700 गावांपैकी 542 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे.
सातारा शहरात राजवाडा ते मोती चौक, पाचशे एक पाटी तसेच बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली गणपतींची मूर्ती नेण्यासाठी भक्तांनी गर्दी केल्यामुळे यात्रेचे स्वरुप आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातारा पोलिसांचा खडा पहारा होता. बुधवारी सकाळपासूनच गणेश मूर्ती घरी नेण्यासाठी  गणेशभक्तांकडून लगबग सुरु होती. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी सजावट करण्यात आली होती. सातारा शहरात राजवाडा बसस्थानकात ठेवलेले गणपती वाजतगाजत मिरवणूक काढून नेले जात होते. तसाच प्रकार बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली सुरु होता. तेथून महावितरण कंपनीच्या कार्यालयापर्यंत मूर्ती विक्रेते असल्याने तेथे गणपतीची मूर्ती नेण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, सर्व परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह सर्व टीम तैनात होत्या. त्याचबरोबर राजवाडा परिसरात शाहूपुरी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजवाडा येथून वाजतगाजत पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढण्यात आली.
  • पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना
सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी परंपरेनुसार पारंपरिक वाद्यात गणपती बाप्पांचे आगमन झाले. नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांच्याकडून त्यांनी मूर्ती घेतली. शिवतीर्थ येथून बॅण्डच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्या मिरवणुकीचे स्वागत डॉ. चंद्रशेखर घोरपडे यांनी केले. कराडचा एक बॅण्ड तसेच आणखी एक बॅण्ड सहभागी झाला होता. फटाके फोडून गणपती बाप्पांचे स्वागत करण्यात आले.
  • सीईओ याशनी नागराजन यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या निवासस्थानी सावित्री या बंगल्यामध्ये बुधवारी सकाळी 11 वाजता गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांचे पती, त्यांच्या मातोश्री आदी उपस्थित होते. गणपतीची आरती करण्यात आली.
  • पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जपली परंपरा
तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी निवासस्थानी गणपती बसवण्याची पद्धत सुरु केली होती. ती सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कायम सुरु ठेवली. वाजतगाजत पालखीतून गणपती आणून विधिवत पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना केली.
  • सोन्या मारुती मंडळाकडून रोपांचे वाटप
गणपती आगमन मिरवणूक सुरु असताना सातारा शहरात वेगवेगळ्या मंडळांचे अनेक चांगले उपक्रम सुरु होते. त्यात सोन्या मारुती मंडळाने झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत तुळशीच्या झाडांची रोपे सातारकरांना दिली. पारंपरिक वाद्यात शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
Advertisement
Advertisement
Tags :

.