For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणपती बाप्पा आले घरा..!

12:51 PM Aug 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
गणपती बाप्पा आले घरा
Advertisement

पावसाचा व्यत्यय, मात्र उत्साहाचे वातावरण : साहित्य खरेदीसाठी तुफान गर्दी

Advertisement

पणजी : राज्यात गणेश चतुर्थी उत्सवाला प्रारंभ झाला असून पहाटेपासून अनेकांच्या घरात श्री गणेशाच्या पार्थिव पूजेला प्रारंभ झाला. राज्यात उत्साहाचे वातावरण असून पावसाने धुमाकूळ घातला असला तरीदेखील भक्तांमध्ये उत्साह संचारलेला आहे.  आज सायंकाळी चार वाजेपर्यंत या महापूजा चालतील. गोव्यातील युवा कलाकार घुमट आरती सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. ऐन गणेश चतुर्थीमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असे जे भाकीत केले होते ते खरे ठरले गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे बाजारांवर परिणाम झाला. ग्राहकांना तथा गणेश भक्तांना भिजतच माटोळीचे सामान खरेदी करणे भाग पाडले. मंगळवारी सायंकाळपर्यंत घराघरांमध्ये श्री गणेशाच्या स्वागतासाठी माटोळीचे बांधकाम चालू होते. आज सकाळी श्री गणेश पूजेला प्रारंभ होणार असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला मंगळवारी चित्रशाळेतून गणेशमूर्ती घरी आणण्यात आल्या. या गणेशमूर्तींचे आरती ओवाळून महिलावर्गाने जोरदार स्वागत केले तर बच्चे मंडळींनी फटाके फोडून आपला आनंदोत्सव साजरा केला.

पुरोहित मंडळी सज्ज     

Advertisement

यंदा राज्यात भटजींचा तुटवडा नाही कारण महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागातून पुरोहित मंडळी गोव्यात आलेली आहेत. गोव्यातील पूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली हे पुरोहित प्रत्येकाच्या घरी जाऊन गणेश पूजा सांगतील. आज पहाटे  गणेश पूजेला अनेकांच्या घरात प्रारंभ झाला कारण भटजींना तेवढा वेळ मिळत नाही त्यामुळे काही जणांनी पहाटेच श्री गणपतीची पूजा करण्याचे ठरविले. श्री गणेश चतुर्थीचा उत्सव हा गोव्यातील सर्वात मोठा उत्सव आहे आणि या उत्सवासाठी गोव्याबाहेरील अनेक मंडळी मिळेल त्या वाहनाने गोव्यात पोहोचले.  गोव्यात येणारी सर्व विमाने फुल्ल झालेली आहेत व तिकिटांचे दरही बरेच वाढलेले आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, मंगळूर, बंगळूर इत्यादी ठिकाणाहून येणाऱ्या बसेस तसेच काही भागात चालू असलेल्या रेल्वेगाड्या देखील फुल्ल झालेल्या आहेत.

वाहनांची गर्दी

राज्यातील भक्तमंडळींमध्ये उत्साह संचारलेला असून मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत राज्यातील सर्व रस्त्यांवर वाहनांची एकच गर्दी उसळलेली दिसून येत होती.  पणजी, फोंडा, मडगाव, म्हापसा, पेडणे, डिचोली, वाळपई, सांगे, केपे, वास्को कुडचडे येथील बाजारपेठांमध्ये गणेश चतुर्थी निमित्त सामान खरेदीसाठी तुफान गर्दी झाली होती. पावसामुळे जरी  व्यत्यय आला तरी देखील भक्तांमध्ये उत्साह बराच संचारलेला दिसून येत होता. गोव्यातील विविध भागांमध्ये दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस असे घरगुती गणपती पुजले जातात तर सार्वजनिक गणेशोत्सव 11 दिवस पर्यंत चालणार. आज दुपारपर्यंत सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणेश पूजा करण्यात येईल. गणेशोत्सवात घरोघरी घुमट आरती वादन केले जाते व त्यावर आधारित  आरत्या म्हटल्या जातात. गोमंतकीय कलाकारांचे ते एक वैशिष्ट्या आहे. हजारो युवावर्ग घुमट आरतीची गेले काही दिवस तालीम घेत होते.

Advertisement
Tags :

.