For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाण्यासाठी वणवण, वळीव पावसाकडे लक्ष

10:28 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाण्यासाठी वणवण  वळीव पावसाकडे लक्ष
Advertisement

ऊस पिकाची हानी : हल्याळ तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंतातूर. मोठ्या वळिवाची प्रतीक्षा

Advertisement

हल्याळ : तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. त्याचबरोबर आता पाण्याअभावी उसाचे पीक वाळत चालले आहे. यामुळे शेतकरी वर्ग फारच चिंतातूर झाला आहे. हल्याळ तालुक्यात सर्वच गावात हीच समस्या निर्माण झाली आहे. वळीव पावसाकडे समस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावर्षी पावसाळा फारच कमी झाल्यामुळे भात पिकांवर व इतर मका, कापूस पिकांवर याचा परिणाम होत कमी उत्पादन झाले होते. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. प्रत्येक गावात पिण्याची समस्या निर्माण झाली आहे. याचबरोबर प्रमुख नगदी पीक म्हणून प्रत्येक शेतकरी उसाचे उत्पादन घेत आहे. उसाचे लागवडी क्षेत्र दरवर्षी वाढत चालले आहे. कारण हल्याळ गावातच साखर कारखाना झाल्यामुळे उसाची वेळेत उचल व दर चांगला मिळत असल्याने ऊसक्षेत्र वाढलेले आहे. यावर्षी हल्याळ तालुक्यात 14 हजार एकरहून अधिक ऊस लागवडीखाली आला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर अथवा बोअरवेल आहे, त्यांनी आतापर्यंत उसाला पाणी दिले आहे पण अशा विहिरी व बोअरवेलसुद्धा आटत चालल्या आहेत. अशी परिस्थिती सर्वच गावांत पहावयास मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी बोअरवेल मारूनसुद्धा पाणी लागल्या नसल्याच्या तक्रारी होत आहेत. सातमनी, बी. के. हळ्ळी, मूर्कवाड, कर्लकट्टा, सनकनकोप्प, यडोगा व इतर भागात ऊस पिके पाण्याअभावी वाळत चालली आहे. यावेळी 12 एप्रिल उजाडले आहे पण अजूनपर्यंत वळिवाच्या पावसाची हजेरी नाही. दरवर्षी एप्रिलमध्ये वळिवाचा पाऊस सहा-सातवेळा पडतो, मात्र यावर्षी एकदासुद्धा पाऊस न पडल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

बहुपयोगी पाणीपुरवठा योजना संथगतीने

Advertisement

सात वर्षापूर्वी विद्यमान आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी हल्याळ तालुक्यातील सर्व गावांना व शेतीसाठी पाणीपुरवठा योजना सरकारकडून मंजूर करून घेतली. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार होती. शिवाय तळे, विहिरी, बंधाऱ्यांमध्ये काळी नदीचे पाणी सोडून योजनेमध्ये समाविष्ट केले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीची जागा पाईपलाईनसाठी स्वखुशीने दिली होती. पण या सात वर्षात योजनेचे काम 50 टक्केसुद्धा झाले नसल्याचे मत बी. के. हळ्ळी, संकनकोप्प गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. ही योजना पूर्ण झाली असती तर शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागले नसते व पिकेसुद्धा वाळत चालली नसती, असे मत व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.