सर्वाधिक लांब जीन्स,3600 किलो वजनाचे बटन
माणूस विश्वविक्रम नोंदविण्यासाठी काहीही करत असतो. अलिकडेच चीनने जगातील सर्वात मोठी जीन्स तयार करण्यासाठी अत्यंत अधिक प्रमाणात कापडाचा वापर केला आहे. जगातील सर्वात मोठी जीन्स ही पीसाच्या मीनारापेक्षाही मोठी आहे. जगातील सर्वात मोठी जीन्स तयार करण्यासाठी 30 कारागिरांनी 18 दिवसांपर्यंत काम केले आहे. चीनच्या एका कापड निर्माता कंपनीने 30 कर्मचाऱ्यांना 18 दिवसांसाठी केवळ एक जीन्स तयार करण्यासाठी जुंपले होते. ही जीन्स तयार झाल्यावर याची लांबी 76.34 मीटर इतकी होती. तर पीसाच्या मिनाराची लांबी 55 मीटर आहे.
76.34 मीटर लांब या जीन्सला लोकांसाठी प्रदर्शित करण्यात आले आहे. चीनच्या गुआंग्शी शहरात ही जीन्स लोकांना दाखविण्यात आल्यावर ते दंगच झाले. या जीन्सच्या कंबरेचा आकार 58.164 मीटर इतका आहे. चीनपूर्वी जगातील सर्वात लांब जीन्सचा विक्रम पॅरिस शहराच्या नावावर होता. त्या जीन्सची लांबी 65.60 मीटर होती. चीनममध्ये तयार करण्यात आलेल्या जीन्समधील बटनाचे वजन 3.6 टन आहे. याचबरोबर यात 7.8 मीटर लांबीचा जिपर लावण्यात आला आहे. हा जिपर स्टेनलेस स्टीलने तयार करण्यात आला आहे. म्हणजेच या जिपरला कधीच गंज चढणार नाही. स्तंभाच्या आधारावर ही जीन्स टांगण्यात आली तर परिसरासाठी ती तंबूचे काम करू शकेल असे अनेक लोकांनी म्हटले आहे. तर अनेक जण याला पैसे, कापड आणि वेळ वाया घालविण्याचा प्रकार संबोधित आहेत.