लोंढा वनविभागाकडून जंगली प्राण्यांबाबत जनजागृती
गावोगावी बैठका, पत्रकांचे वाटप : ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी : वन्यप्राण्यांकडून धोका उद्भवल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
खानापूर : लोंढा वनविभागातील क्षेत्रात जंगली प्राण्यांसह हत्ती,अस्वल आणि गव्यांचा वावर मोठ्याप्रमाणात वाढल्याने तसेच सध्या सुगीचा हंगाम सुरू आहे. जंगली प्राण्यांकडून मानवावर हल्ले होऊ नयेत, तसेच इतर नुकसान होऊ नये, यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, वन्यप्राण्यांबाबत कोणती उपाययोजना राबवावी, याबाबत लोंढा वनक्षेत्रातील ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गावांमध्ये बैठका घेऊन प्रात्यक्षिके दाखवून पत्रके वाटून, जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती लेंढा विभागाचे वनाधिकारी वाय. पी. तेज यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
खानापूर तालुक्यातील लेंढा या विभागात घनदाट जंगल आणि दुर्गम प्रदेश आहे. या जंगल विभागात गवे, सांबर, चित्तळ, मोर, वाघ, बिबटे तसेच अलीकडे हत्तींचा वावर मोठ्याप्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक यांच्यात संघर्ष वाढलेला आहे. हत्तींच्या कळपानी गेल्या काही दिवसांपासून धुडगूस घातलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. यासाठी वनखात्याकडून जंगली प्राण्यांबाबत कोणती सावधानता तसेच खबरदारी बाळगावी याबाबात जनजागृती हाती घेण्यात आली आहे. वाघ, हत्ती व इतर जंगली श्वापद दृष्टीस पडल्यास 1926 या क्रमांकावर संपर्क साधून प्राणी असल्याची माहिती वनखात्याला द्यावी. तसेच सायंकाळी 6 नंतर पाळीव प्राण्यांना बाहेर न सोडता गोठ्यात बांधून ठेवावेत.
परिसरात एकट्याने फिरू नये
ज्या गावांच्या परिसरात हत्ती, वाघ, बिबट्यांचा वावर आहे. त्या परिसरात मुलांना सोडू नये किंवा एकाट्याने फिरु नये. शेतकऱ्यांनी आपली जनावरे चरावयास नेताना मोकळ्या जागेत सोडावीत, झाडेझुडपे असलेल्या परिसरात सोडू नये, अथवा थांबू नये, गावाभोवतलची झुडपे तातडीने हटवावीत, रात्रीच्यावेळी शेताचे रक्षण करण्यासाठी शेतात जाताना योग्य खबरदारी घ्यावी, अथवा शेताच्या राखणीसाठी एकटे जावू नये, ज्या विभागात हिंस्त्र प्राणी आहेत तेथे पहाटे आणि सायंकाळच्या दरम्यान बाहेर पडू नये. हत्ती, वाघ यासह जंगली प्राण्यांबाबत कोणतेही खोटे व्हीडीओ अथवा माहिती पसरु नये, पाळीव जनावरांवर जंगली प्राण्याने हल्ला करून ठार मारल्यास त्या विभागात जावू नये, अथवा मृत शरीराची हलवाहलवी करू नये, याबाबत तातडीने वनखात्यांशी संपर्क साधावा, अशा माहितीची पत्रके गावोगावी वाटून तसेच माहिती देवून जागृती करण्यात येत असल्याचे लेंढा वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
वनविभाग कर्मचाऱ्यांची पथके रात्रंदिवस कार्यरत राहणार
हत्ती व इतर हिंस्त्र प्राण्यांकडून कोणताही धोका होऊ नये,यासाठी लोंढा वनविभागाच्या कर्मचाऱ्याची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके आळीपाळीने रात्रंदिवस कार्यरत आहेत. हत्तीना परत दांडेली वनविभागात घालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरी लोंढा वनविभागातील नागरिकांनी सतर्क राहावे, आणि वन्यप्राण्यांकडून कोणताही धोका उद्भवल्यास वनखात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.