लोकमान्य सोसायटीतर्फे 6 रोजी ‘संगीत आनंदमठ’ नाटकाचे आयोजन
कोलाज क्रिएशन्सची निर्मिती
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी प्रस्तुत कोलाज क्रिएशन्स निर्मित ऋषी बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अजरामर कादंबरीवर आधारित ‘संगीत आनंदमठ’ हे नाटक गुरुवार दि. 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सायंकाळी 6 वाजता कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे नाटकाचा प्रयोग होईल. हा प्रयोग विनामूल्य असून बेळगावमधील रसिकांनी या नाटकाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नाटकाविषयी थोडक्यात- ऋषी बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली वंदे मातरम् हे गीत लिहिले. 1882 साली त्यांनी ‘आनंदमठ’ ही कादंबरी लिहिली आणि त्यामध्ये वंदे मातरम् या गीताचा अंतर्भाव केला.
‘आनंदमठ’ ही कादंबरी 1770 साली बंगालमध्ये जो दुष्काळ पडला होता, त्या काळात लिहिली गेली. एकीकडे उपासमार, दुसरीकडे शेतसारा सक्तीने वसूल केला जात होता. या सगळ्या प्रकाराने लोक हैराण झाले होते. या काळात सन्यस्तांनी इंग्रजी राजवटीविरुद्ध उठाव केला. त्याचे वर्णन या कादंबरीत आहे. या कादंबरीवरून पुण्यातील वंदे मातरम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी लेखिका विनिता तेलंग यांच्याकडून दोन अंकी संगीत नाटक लिहून घेतले. पुण्याच्या कोलाज क्रिएशन्सतर्फे हे नाटक मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा आले आहे. रविंद्र सातपुते यांनी त्याचे दिग्दर्शन केले.
नाटकाला संगीत दिग्दर्शक अजय पराड यांचे संगीत लाभले आहे. जयंत टोले यांनी उत्कृष्ट नेपथ्य रचना केली आहे. गायत्री चक्रदेव हिने वेशभूषा, अरविंद सूर्य यांनी रंगभूषा तर प्रकाशयोजनाकार निखिल मारणे यांनी प्रकाशयोजना केली आहे. या नाटकातील सर्व कलाकार 22 ते 28 वयोगटातील आहेत. पारंपरिकता जपत आधुनिकतेचा भाग नाटकात आणला गेला असल्याने सादरीकरण अतिशय रंजक व प्रेक्षणीय झाले आहे. या संगीत नाटकाचा प्रयोग महाराष्ट्र राज्य संगीत नाट्या स्पर्धेत झाला. या स्पर्धेत या नाटकाला संपूर्ण महाराष्ट्रात सांघिक प्रथम क्रमांकासह लेखनासाठी प्रथम क्रमांक, दिग्दर्शनासाठी प्रथम क्रमांक, नेपथ्य, संगीत, गायनासाठी प्रथम क्रमांक मिळाला आहे.
त्याचबरोबर या नाटकाला अखिल भारतीय मराठी नाट्या परिषद मुंबई शाखेचा सर्वोत्तम संगीत नाटक पुरस्कारदेखील मिळाला आहे. याच संस्थेने अनुष्का आपटे हिला सर्वोत्तम गायिका-अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील दिला आहे. हे नाटक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गाजत आहे. मुंबईच्या नेहरू सेंटर वरळी येथे 27 व्या राष्ट्रीय नाट्या महोत्सवातदेखील याची निवड झाली होती. पुणे, सांगली, इचलकरंजी, जळगाव, गोवा असे दौरे करून आता बेळगावमध्ये नाटक सादर केले जाणार आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी बेळगावच्या रसिक मंडळींसाठी या नाटकाचे आयोजन केले आहे. या प्रयोगासाठी ‘दै. तरुण भारत’ मीडिया पार्टनर असणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान रसिकांना मिळतील, असे कळविण्यात आले आहे.