लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा रविवारपासून
पोलीस -बीडीएफए यांच्यात प्रदर्शनीय सामना
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य को-ऑप. सोसायटी पुरस्कृत, लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा रविवार दि. 25 मे पासून लव्हडेल शाळेच्या टर्फ मैदानावर प्रारंभ होत आहे. वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत 20 संघांनी भाग घेतला असून चार गटात संघ विभागाले गेले आहेत. अ गटात- इलेव्हन स्टार, फँको एफसी, स्वस्तीक इलेव्हन, शिवाजी कॉलनी, दर्शन युनायटेड, ब गटात - निपाणी एफसी, गोवन्स एससी, मोहब्ल्यु इलेव्हन, वायएमसीए, कॉसमॅक्स स्पोर्ट्स क्लब, सी गटात- युनायटेट गोवन्स, युनायटेट युथ, चौगुले ब्रदर्स, झिगझॅग स्पोर्ट्स क्लब, फास्ट फॉल्वर्ड, डी गटात- ब्रदर्स एफसी, टिळकवाडीइलेव्हन, सिटी स्पोर्ट्स, टिळकवाडी एफए, साईराज एफसी या संघांचा समावेश आहे.
रविवार दि. 25 मे रोजी स्पर्धेला प्रारंभ होणार असून उद्घाटनाचा प्रदर्शनिय सामना पोलीस इलेव्हन व बीडीएफए इलेव्हन यांच्यात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 55,000 रुपये रोख, आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला 35,000 रुपये रोख, चषक,तिसऱ्या क्रमांकाला 25,000 रुपये रोख, चषक व चौथ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये रोख व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, स्पर्धेतील उगवता खेळाडू, उत्कृष्ट गोलरक्षक,उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ अशी तर विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडूंना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. चषकाचे अनावरण बेळगाव पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीडीबीएचे पदाधिकारी उपस्थित होते.