लोककल्प फौंडेशनतर्फे शिलाई मशिन्सचे वितरण
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील 32 गावांतील महिलांना शिलाई मशिनींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविणे व शिवणकामाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा होता. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील 32 गावांना दत्तक घेतले असून ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या संधी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. याअंतर्गत जांबोटी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शाखा व्यवस्थापक श्रीराज शिंदे, भूषण तामण्णाचे, लोकमान्य सोसायटीचे गुरुप्रसाद तंगणकर, लोककल्प फौंडेशनचे निशांत जाधव, संतोष कदम, संदीप पाटील उपस्थित होते. या उपक्रमामुळे महिलांना शिवणकला अधिक विकसित करण्यास, उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाबद्दल लाभार्थी महिलांनी लोककल्प फौंडेशन व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे मन:पूर्वक आभार मानले व या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास व त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.