लोकेडी, कोरीर बोस्टन मॅरेथॉन विजेते
वृत्तसंस्था / बोस्टन
येथे झालेल्या 2025 च्या बोस्टन मॅरेथॉनमध्ये केनियाच्या जॉन कोरीर आणि शेरॉन लोकेडी यांनी आपले निविर्वाद वर्चस्व राखत अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या विभागातील विजेतेपद पटकाविले.
20 मैल पल्ल्याच्या या बोस्टन मॅरेथॉनमध्ये केनियाच्या जॉन कोरीरने आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांना बरेच मागे टाकत विजेतेपद हस्तगत केले. कोरीरने 2024 च्या शिकागो मॅरेथॉनचे जेतेपद मिळविले होते. कोरीरने पुरुषांच्या विभागात या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सर्वोत्तम दुसऱ्या क्रमांकाची जलदवेळ नोंदविली. तांझानियाच्या अल्फोन्सी सिंबुने 2 तास 5 मिनीटे 0.4 सेकंदाचा अवधी घेत दुसरा स्थान पटकाविले. 2012 साली या स्पर्धेत जॉन कोरीरचा मोठा भाऊ वेस्ले कोरीरने ही स्पर्धा जिंकली होती.
महिलांच्या विभागात केनियाच्या शेरॉन लोकेडीने आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकले. लोकेडीने 2022 साली न्युयॉर्क मॅरेथॉन स्पर्धा जिंकली होती. बोस्टन मॅरेथॉनमध्ये लोपेडी आणि ओबेरी यांच्यात शेवटपर्यंत चुरस पहावयास मिळाली. पण लोकेडीने सुमारे 1 हजार मी.चे अंतर असताना सुसाट वेगाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. लोकेडीने 2 तास 17 मिनीटे आणि 22 सेकंदाचा अवधी घेतला. ओबेरीने महिलांच्या विभागात 2 तास 17 मिनिटे 41 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर इथोपियाच्या येहुलॉने 2 तास 18 मिनीटे 6 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले. बोस्टन मॅरेथॉनची ही 50 वी शर्यत होती. त्यामुळे व्हिलचेअर प्रकारात बॉब हॉलने विजेतेपद पटकाविले. व्हिलचेअर महिलांच्या विभागात अमेरिकेच्या सुसाना स्केरोनीने विजेतेपद मिळविले.