धारवाडसह राज्यात लोकायुक्त छापे
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी कारवाई : 10 अधिकाऱ्यांना दणका
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील बेंगळूर, धारवाड, मंड्या, शिमोगा, म्हैसूर, बिदर, दावणगेरे आणि हावेरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या कारवाईत 10 भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. छाप्यात कोट्यावधी रुपयांची बेकायदेशीर स्थावर मालमत्ता, सोने आणि रोख रक्कम आढळली आहे.
बेंगळूरमधील आरटीओ अधीक्षक कुमारस्वामी, मंड्या महानगरपालिकेचे सीएओ पुट्टस्वामी, बिदर कृष्णा अप्पर रिव्हर प्रकल्पाचे अभियंता प्रेम सिंग, म्हैसूर-मडिकेरी विभागाचे साहाय्यक अभियंता गिरीश डी. एम., हावेरीच्या प्रकल्प संचालक कार्यालयाचे कार्यकारी अभियंता शेकाप्पा यांच्यासह 10 अधिकाऱ्यांची कार्यालये, निवासस्थाने तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर मंगळवारी पहाटे लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकांनी छापे टाकले.
बिदरमध्ये लोकायुक्त डीवायएसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा अप्पर रिव्हर प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रेम सिंग राठोड यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. यादगिरी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भीमरायनगुडी येथील निवासस्थान कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले. बेहिशेबी मालमत्ता संपादनाच्या आरोपावरून शिमोगा मेडिकल कॉलेजचे डीन स्टेनो यांच्या निवासस्थानावर धाड टाकण्यात आली आहे. लोकायुक्त अधीक्षक मंजुनाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
कोडगूमध्ये सार्वजनिक बांधकाम अभियंता गिरीश यांचे कार्यालय आणि निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला आहे. लोकायुक्त डीवायएसपी दिनकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तर मडिकेरीमध्ये लोकायुक्त उपनिरीक्षक वीणा नायक यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला.
हावेरी जिल्हा नगरविकास कक्षाचे कार्यकारी अधिकारी अभियंता शेखप्पा मत्तिकट्टी यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आहे. धारवाडमधील प्रो. सुभाषचंद्र यांच्या बंगल्यावरही धाड टाकण्यात आली आहे. म्हैसूरमधील महसूल निरीक्षक रामास्वामी यांच्या निवासस्थानीही लोकायुक्त अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. मंड्या जिल्ह्यात मंड्या नगरपालिकेचे सीएओ पुट्टास्वामी यांच्याशी संबंधित 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
धारवाड विद्यापीठातील प्राध्यापकांनाही दणका
धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि डॉ. आंबेडकर अध्ययन विभागाचे समन्वयक सुभाषचंद्र नाटीकार यांच्या यालक्की शेट्टर कॉलनीतील बंगला, कोप्पळमधील निवासस्थान, विजापूर जिल्ह्यातील ताळीकोट येथील त्यांचे निवासस्थान येथेही छापे टाकण्यात आले आहेत. नाटीकार हे मंगळवारी मूल्यांकन निबंधक म्हणून पदभार स्वीकारणार होते. तथापि, बेकायदेशीर मालमत्ता संपादनाच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी त्यांची निवासस्थाने आणि कार्यालयावर छापे टाकून धक्का दिला आहे.
एपीएमसी साहाय्यक संचालकाच्या निवासस्थानी दीड किलोहून अधिक सोने
दावणगेरेतील एपीएमसीच्या विक्री विभागाचे साहाय्यक संचालक जे. प्रभू यांच्या निवासस्थानावरील छाप्यात 1 किलो 700 ग्रॅम सोने व 10 किलो चांदी सापडली. अंजनेय कॉलनीतील निवासस्थान, चन्नगिरी तालुक्यातील दो•घट्ट येथील फार्महाऊस आणि कार्यालयावर लोकायुक्त पोलीस अधीक्षक एम. एस. कौलापुरे यांच्या नेतृत्वाखाली छापे टाकण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी 6 भूखंडांची कागदपत्रेही आढळली असून काही भूखंड त्यांनी खरेदी केले तर काही दानपत्र स्वरुपात मिळाल्याचे तपासातून पुढे आले आहे.
धाडी पडलेल्या अधिकाऱ्यांची नावे
►कुमारस्वामी - अधीक्षक, आरटीओ विभाग इलेक्ट्रॉनिक सिटी बेंगळूर
►पुट्टस्वामी - सीएओ, मंड्या नगरपालिका
►प्रेम सिंग राठोड - मुख्य अभियंता, बिदर कृष्णा अप्पर रिव्हर प्रकल्प
►रामास्वामी सी. - महसूल निरीक्षक, हुटगळ्ळी, नगरपरिषद, म्हैसूर
►सुभाषचंद्र नाटीकार -प्राध्यापक, कर्नाटक विद्यापीठ धारवाड
►सतीश - वरिष्ठ परीक्षक प्राथमिक पशुरुग्णालय, हुलीगोल
►लक्ष्मीपती सी. एन. - एफडीएएस, आयएमएस मेडिकल कॉलेज शिमोगा
►प्रभु जे. - साहाय्यक संचालक, एपीएमसी दावणगेरे
►गिरीश डी. एम. - साहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग म्हैसूर -मडिकेरी
►शेकाप्पा - कार्यकारी अभियंता, प्रकल्प संचालक कार्यालय हावेरी