विजापुरात लोकायुक्त छापा
सरकारी कर्मचाऱ्याच्या घरात 2.34 कोटींची अवैध मालमत्ता
वार्ताहर/विजापूर
उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून कर्नाटक गृह मंडळाचे प्रथमश्रेणी साहाय्यक शिवानंद केंभावी यांच्या घर आणि फार्महाऊसवर लोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. यावेळी अंदाजे 2 कोटी 34 लाख रुपये मूल्याची अवैध मालमत्ता अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. याबाबत लोकायुक्तांच्या एसपी टी. मल्लेश यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, कर्नाटक गृह मंडळाचे प्रथमश्रेणी साहाय्यक शिवानंद केंभावी यांच्या विजापूर शहरातील सुकून कॉलनीतील घर आणि विजापूर तालुक्यातील निडगुंदी गावाजवळील फार्म हाऊसवर लोकायुक्तांनी गुरुवारी छापा टाकला. यावेळी दस्तऐवजांची तपासणी करत असताना अंदाजे 15 लाख रुपयांची रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, वाहने आणि इतर मालमत्तेसंबंधित दस्तऐवज सापडले आहे. यावरून अंदाजे 2 कोटी 34 लाख रुपये मूल्याच्या अवैध मालमत्तेचा शोध लागला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर कारवाई लोकायुक्त एसपी डॉ. मल्लेश यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यामध्ये डीवायएसपी सुरेश रेड्डी, सीपीआय आनंद तकन्नवर, आनंद डोणी आणि लोकायुक्त पोलीस स्थानकाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
बागलकोट येथे लोकायुक्त छापा
वार्ताहर / जमखंडी : बागलकोट येथील पंचायतराज खात्याचे अकाउंटंट यांच्या घर व कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी धाड टाकली. पंचायतराज खात्याचे अकाउंटंट मल्लेश यांनी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता केल्याच्या माहितीवरून एकाचवेळी बागलकोट येथील विरापूर जुन्या वसाहतीमधील बंगल्यावर, तसेच पंचायतराज कार्यालय व त्यांच्या मूळगावी तल्लिकेरी येथील घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई केली. सदर कारवाई लोकायुक्त खात्याचे डीवायएसपी सिद्धेश यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.