पाच अधिकाऱ्यांवर लोकायुक्त छापे
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूर, चित्रदुर्ग, तुमकूर, हासनसह राज्यातील अनेक ठिकाणी लोकायुक्त विभागाने 5 अधिकाऱ्यांवर तडकाफडकी छापे टाकले. बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी अधिकाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालये व इतर ठिकाणी धाडी टाकण्यात आले. कारवाईवेळी अधिकाऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणावर घबाड आढळले आहे.
राष्ट्रीय महामार्ग खात्यातील हासन विभागाचे कार्यकारी अभियंता जयण्णा यांच्या निवासस्थानी, फार्महाऊस आणि इतर ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या असून जयण्णा यांच्याजवळ 5.88 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आढळली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. हासन शहरातील जयण्णा यांचे कार्यालय, जयनगर येथील निवासस्थान, चन्नपट्टण हाऊसिंग बोर्डाच्या विवेकानंद सर्कलजवळील निवासस्थान, हार्डवेअर दुकान, कोडगू जिल्ह्यातील फार्महाऊसवर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकांनी एकाच वेळी धाडी टाकून झडती घेतली. लोकायुक्त अधीक्षक स्नेहा यांच्या पथकाने ही कारवाई केली. जयण्णा यांच्याजवळ 18 भूखंड, 7 निवासस्थाने आढळली आहेत.
चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील गौरीबिदनूर येथील ग्रामीण पाणीपुरवठा आणि नैर्मल्य खात्याचे अभियंता अंजनेय मूर्ती यांचे निवासस्थान व कार्यालयावरही छापे टाकण्यात आले. अंजनेयमूर्ती यांच्या नावे बेंगळूरमध्ये तीन निवासस्थाने आणि कमर्शिअल कॉम्लेक्स असल्याचे आढळले आहे.
चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वेंकटेश यांचे निवासस्थान, क्लिनिक आणि कार्यालयावर धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. हिरीयुर तालुक्यातील आदिवाल येथील डॉ. वेंकटेश यांनी गावात खासगी क्लिनिक उघडले आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादन केल्याचा आरोप झाल्याने त्यांच्या मालमत्तांवर लोकायुक्त विभागाने छापे टाकले. डॉ. वेंकटेश यांच्याजवळ अर्धा किलो सोन्याचे दागिने, 7 भूखंडांची कागदपत्रे, दोन ठिकाणी जमिनी खरेदी केल्याचे दस्तऐवज यासह एकूण 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीची स्थावर व जंगम मालमत्ता आढळली आहे.
बेंगळूरच्या दासरहळ्ळी येथील बेंगळूर महानगरपालिकेचे महसूल अधिकारी एन. वेंकटेश यांच्या निवासस्थानीही छापे टाकण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी सोन्याचांदीचे दागिने, महागड्या कार व इतर मालमत्ता आढळून आली आहे. त्यांच्या नावे तलघट्टपूर येथे बंगला, म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगूड येथे 4 एकरातील फार्महाऊस आढळले आहे.
बेंगळूर शहर विकास प्राधिकरणाचे (बीडीए) अधिकारी ओम प्रकाश यांच्या कोडिगेहळ्ळी येथील बंगल्यासह कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईवेळी ओम प्रकाश यांच्याजवळ मोठ्या प्रमाणावर दागिने व मालमत्ता आढळून आली.