उत्तर कर्नाटकातील विविध चेकपोस्टवर लोकायुक्त छापे
वाहनधारकांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसुली होत असल्याचा आरोप
प्रतिनिधी/ बेंगळूर
उत्तर कर्नाटकात महामार्गांवरील विविध चेकपोस्टवर मंगळवारी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी तडकाफडकी छापे टाकले. निपाणीजवळील कोगनोळी चेकपोस्टसह बिदर, कोलार, बळ्ळारी आणि विजापूर जिल्ह्यांमधील आरटीओ चेकपोस्टवर छापे टाकण्यात आले. वाहनधारकांकडून पैशांची वसुली होत असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. अचानक छापे पडल्याने चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.
बिदरमधील आरटीओ कार्यालय, याच जिल्ह्यातील मोळकेरा येथील चेकपोस्टवर लोकायुक्त एसपी बी. के. उमेश यांच्या नेतृत्त्वाखाली छापा टाकण्यात आला. मालवाहू वाहनधारकांकडून पैशांची वसुली होत असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बळ्ळारी तालुक्यातील पीडी हळ्ळी येथील चेकपोस्टवर सोमवारी मध्यरात्री लोकायुक्त एसपी सिद्धराजू यांच्या नेतृत्त्वाखाली छापा टाकण्यात आला. कोलार जिल्ह्याच्या श्रीनिवासपूर तालुक्यातील ताडीगोळ क्रॉसवरील चेकपोस्ट आणि मुळबागील तालुक्यातील नंगली चेकपोस्टवरही धाड टाकण्यात आली. यावेळी तेथे बेकायदा रक्कम आढळली आहे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.
विजापूर जिल्ह्याच्या चडचण तालुक्यातील धुळखेड येथील चेकपोस्टवर लोकायुक्त एसपी मल्लेश यांच्या नेतृत्त्वाखाली छापा टाकण्यात आला. यावेळी येथे वाहनधारकांकडून बेकायदेशीरपणे वसुली होत असल्याचे आढळून आले. निपाणीजवळील कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गावरील चेकपोस्टवर लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्त्वाखाली छापा टाकण्यात आला. येथील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.