राज्यभरात 90 ठिकाणी लोकायुक्त छापे
17 भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका : बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी सोमवारी लोकायुक्त विभागाने 17 भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला. राज्यभरात 90 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आला असून या कारवाईवेळी मोठ्या प्रमाणात घबाड आढळून आले आहे. बेंगळूर, बेळगाव, बिदर, रायचूर, कलबुर्गी, चित्रदुर्ग, मंड्या, बळ्ळारी, तुमकूर, उडुपी, हासन, दावणगेरे आणि हावेरी या जिल्ह्यांमध्ये धाडी टाकण्यात आल्या आहेत.
उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादन केल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने या अधिकाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालयांमध्ये झडती घेऊन तपासणी करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांची अधिक चौकशी केली जात आहे. या कारवाईत 200 हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. अशी माहिती लोकायुक्त पोलीस विभागाचे महानिरीक्षक डॉ. ए. सुब्रह्मण्येश्वर यांनी दिली. कारवाईवेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांजवळ निवासस्थाने, भूखंड, पैसे, दागिने, वाहने, ऐशोआरामी वस्तू मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत.
चित्रदुर्गमधील अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घबाड
चित्रदुर्ग जिल्ह्यातील दोन अधिकाऱ्यांनाही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दणका दिला. हिरीयूर येथे चंद्रा लोआऊटमध्ये वनखात्याचे एसीएएफ नागेंद्र नायक यांच्या निवासस्थानी 600 ग्रॅम सोने, 4 किलो चांदी, दीड लाख रुपयांहून अधिक रोकड आढळली आहे. हिरीयूरच्या कुवेंपूनगर येथील समाज कल्याण खात्याचे साहाय्यक संचालक कृष्णमूर्ती यांच्या निवासस्थानीही 600 ग्रॅम सोने, 3 किलो चांदी व रोकड आढळून आली आहे. सदर ऐवज लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे.
दावणगेरेत 9 मालमत्तांवर धाडी
दावणगेरे येथील बॉयलर्सचे उपसंचालक एस. आर. श्रीनिवास यांच्याशी संबंधित 9 मालमत्तांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी लक्ष्य बनविले. उल्लाळ उपनगरमधील बंगला, बॅडरहळ्ळी येथील त्यांच्या वडिलांचे निवासस्थान, बीईएल, विनायकनगर येथील निवासस्थान, बेंगळूरमधील उपकार लेआऊट, आंध्रहळ्ळी आणि चामराजनगर जिल्ह्यातील कोळळ्sगाल येथेही त्यांच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यांच्याजवळ रोख रक्कम. सोन्याचांदीचे दागिने, किमती घड्याळे, आलिशाल कार व इतर मालमत्ता आढळून आली.
तुमकूरमध्येही कारवाई
तुमकूर जिल्ह्यातील सिरा येथील ग्रामीण पाणीपुरवठा व नैर्मल्य विभागाचे साहाय्यक अभियंता नागेंद्रप्पा यांनी बेहिशेबी मालमत्ता संपादन केल्याची तक्रार झाली होती. त्यामुळे सोमवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सिरा येथील नागेंद्रप्पा यांचे निवासस्थान, कार्यालय, फार्महाऊस तसेच तुमकूर शहरातील महालक्ष्मीनगर येथील निवासस्थानी छापे टाकले. तुमकूरमधील त्यांच्या निवासस्थानी दोन दुचाकी, दोन कार व इतर मालमत्ता आढळून आल्या.
हासनमध्ये केपीटीसीएलचे कनिष्ठ अभियंता एच. ई. नारायण यांच्या बोम्मनायकनहळ्ळी येथील निवासस्थान व कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या. हावेरीत वन खात्याचे आरएफओ परमेश्वरप्पा पेरलनवर आणि न्यामतीचे आरएफओ मालतेश यांची निवासस्थाने, कार्यालयांवर लोकायुक्त विभागाने छापा टाकून तपासणी केली.
बिदर, बळ्ळारीत छापे
बिदर विभागाचे वन अधिकारी बसवराज डांगे आणि देवदुर्गचे केबीजेएन एलईई तिप्पण्णा अन्नदानी यांच्यावर लोकायुक्त एसपी एस. एस. कर्नुल यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने छापे टाकले. बळ्ळारीचे महसूल निरीक्षक मंजुनाथ यांचे निवासस्थान व कार्यालय लक्ष्य करण्यात आले. त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात बेकायदा मालमत्ता आढळून आल्याचे समजते.
बेंगळूरमध्ये 11 ठिकाणी धाडसत्र
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेंगळूर शहरात 11 ठिकाणी छापे टाकले. आर. आर. नगर, के. आर. पुर, उपकार लेआऊट यासह अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. बेंगळूर महानगरपालिकेच्या आर. आर. नगरचे विभागीय अधिकारी ओ. चंद्रप्पा बिरज्जनवर यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांमध्ये झडती घेण्यात आली. यापूर्वी लाच घेताना चंद्रप्पा यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. ते सध्या परप्पन अग्रहार कारागृहात आहेत. त्यामुळे पुढील कारवाई म्हणून त्यांच्या मालत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. औद्योगिक सुरक्षा खात्याचे उपसंचालकांनाही लक्ष्य करण्यात आले.