राज्यात 54 ठिकाणी लोकायुक्त छापे
भ्रष्टाचार प्रकरणी 12 अधिकाऱ्यांना लोकायुक्तांचा दणका
बेंगळूर : भ्रष्टाचार प्रकरणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी 12 भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला. त्यांच्या मालमत्ता, कार्यालयांसह एकूण 54 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, मंगळूर, यादगिरी, तुमकूर आणि शिमोगा या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. लोकायुक्त विभागाकडे भ्रष्टाचाराची 12 प्रकरणे नोंद झाली होती. बेंगळूरमध्ये 3, म्हैसूरमध्ये 2, शिमोग्यात 2, यादगिरी 1 यासह एकूण 12 तक्रारी दाखल झाल्याने शुक्रवारी सकाळी राज्यातील 54 ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. शंभरहून अधिक अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत भ्रष्ट अधिकाऱ्यांजवळ बेकायदा मालमत्तेसह सोने, चांदी, पैसे आढळून आले.
तुमकूरमधील वाणिज्य आणि उद्योग खात्याचे अतिरिक्त संचालक मुद्दूकुमार, यादगिरी जिल्हा पंचायतीचे नियोजन विभागाचे संचालक बलवंत, दो•बळ्ळापूरचे वरिष्ठ पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धप्पा, हेब्बगोडीचे नगरपालिका प्रशासन सेवा आयुक्त नरसिंह मूर्ती, केआयएडीबीचे प्रथमश्रेणी साहाय्यक बी. व्ही. राजू, वाणिज्य कर खात्याचे आयुक्त रमेशकुमार, मापन कायदा खात्याचे उपनियंत्रणाधिकारी अख्तर अली. भद्रावतीच्या अंतरगंगे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सी. नागेश, बागायत खात्याचे उपसंचालक प्रकाश, मंड्या विभाग कामगार खात्याचे अधिकारी चेतनकुमार, मंगळूर महानगरपालिकेचे अधिकारी आनंद सी. एल., बेंगळूर उत्तर उपविभागाचे प्रथमश्रेणी साहाय्यक मंजुनाथ टी. आर. यांच्यावर लोकायुक्त विभागाने छापे टाकले आहेत.
...अन् अधिकाऱ्याने शेजारच्या घरावर बॅग फेकली
लोकायुक्त अधिकारी तपासणीसाठी येत असल्याचे पाहून मापन कायदा खात्याचे उपनियंत्रक अख्तर अली यांनी सोने आणि पैसे असणारी बॅग खिडकीतून शेजारच्या घरात फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी तक्रार झाल्याने लोकायुक्त पोलिसांनी अख्तर अली यांचे बेंगळूरमधील निवासस्थान आणि कार्यालयावर छापा टाकला. लोकायुक्त अधिकारी घरात शिरताच अख्तर अली यांनी खिडकीतून शेजारच्या घरावर बॅग फेकली. ही बाब निदर्शनास येताच शेजाऱ्यांनी लोकायुक्त अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ती बॅग ताब्यात घेऊन तपासली असता सोने व पैसे आढळून आले.