राज्यभरात 30 ठिकाणी लोकायुक्त छापे
9 अधिकाऱ्यांना दणका : बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी कारवाई
बेंगळूर : भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्त पोलिसांनी दणका दिला आहे. मंगळवारी पहाटे राज्यातील 9 अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसह 30 ठिकाणी छापे टाकण्यात आले. बेंगळूर, रामनगर, मंड्या, बळ्ळारी, चित्रदुर्ग, विजयनगर या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्ता संपादनाच्या आरोपावरून या अधिकाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालये, नातेवाईकांच्या निवासस्थानांवर धाडी टाकून बेकायदा मालमत्तेचा शोध घेण्यात आला. यावेळी या अधिकाऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणावर बेकायदा मालमत्ता आढळली आहे. त्यामुळे लोकायुक्त अधिकारी चक्रावून गेले. बेंगळूर शहर वीजपुरवठा निगमचे (बेस्कॉम) मुख्य व्यवस्थापक एम. एल. नागराज, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सर्कल सुपरिटेंडींग इंजिनिअर सतीश बाबू, कुंदाण ग्रामपंचायीचे पीडीओ डी. एन. पद्मनाभ, कर्नाटक ग्रामीण पायाभूत विकास निगमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता सय्यद मुनीर, बेंगळूर महानगरपालिकेच्या योजना विभागाचे संचालक बी. मंजेश या अधिकाऱ्यांना लोकायुक्त विभागाने दणका दिला आहे. बेंगळूरच्या चेन्नेनहळ्ळी ग्रामपंचायतीचे सदस्य एच. एस. सुरेश यांच्या निवासस्थानाचीही झडती घेऊन बेहिशेबी मालमत्तेचा शोध घेण्यात आला. त्यांच्याजवळ 25 कोटींची मालमत्ता आढळली आहे.
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी तक्रारी आल्याने या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. बेस्कॉमचे मुख्य व्यवस्थापक एम. एल. नागराज हे काही दिवसांपूर्वी 7.50 लाख रुपयांची लाच घेताना लोकायुक्त जाळ्यात अडकले होते. त्यांचे निवासस्थान, कार्यालयांवर धाडी टाकून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. नागराज यांच्याशी संबंधित विजयनगरमधील बी. एड् कॉलेज, डी. एड कॉलेज, आयटीआय कॉलेज, पदवीपूर्व महाविद्यालयातही तपासणी करण्यात येत आहे. नागराज यांच्याजवळ कोडिलगी तालुक्यातच दोन पेट्रोल पंप आहेत. बांधकाम नकाशाला मंजुरी, नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून बेंगळूर महापालिकेच्या योजना विभागाचे संचालक बी. मंजेश यांचे मंड्या जिल्ह्यातील हलगूर येथील निवासस्थान तसेच गुंडापूर येथील त्यांचे नातेवाईक सुरेंद्र यांच्या दोन निवासस्थानांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. सार्वजनिक बांधकाम खात्याचे सर्कल सुपरीटेंडींग इंजिनिअर सतीश बाबू यांच्या निवासस्थानी सोन्या-चांदीचे दागिने पाहून लोकायुक्त अधिकाऱ्यांना धक्काच बसला. आणखी एकीकडे चेन्नेनहळ्ळी ग्रामपंचायतीचे सदस्य एच. एस. सुरेश यांच्या निवासस्थानी मद्याच्या मोठ्या प्रमाणावर बाटल्या आढळल्या आहेत.