राज्यात 40 ठिकाणी लोकायुक्त छापे
बेंगळूर, विजापूरसह सहा जिल्ह्यांत 7 भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारवाई
बेंगळूर : लोकायुक्त विभागाने भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील कारवाई सुरूच ठेवली असून गुरुवारी 7 भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका देण्यात आला. त्यांच्याशी संबंधित 40 ठिकाणी छापे टाकण्यात आले. विजापूर, बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, तुमकूर, यादगिरी, मंगळूर जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सकाळी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. बेहिशेबी मालमत्ता संपादनाच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईवेळी बेकायदा रोख रक्कम, मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीचे दागिने, स्थावर मालमत्ता आढळून आल्या.
लोकायुक्त विभागाने बेंगळूर शहर जिल्ह्यात 12 ठिकाणी, बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यात 8 ठिकाणी, तुमकूर 7, यादगिरी 5, मंगळूर व विजापूर जिल्ह्यात प्रत्येकी 4 ठिकाणी छापे टाकले. तुमकूरमधील निर्मिती केंद्राचे योजना संचालक राजशेखर यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या 10 जणांच्या पथकाने छापे टाकले. तुमकूरच्या सप्तगिरी कॉलनीत राजशेखर यांच्या भावाच्या निवासस्थानावरही धाड टाकून मालमत्तेची पडताळणी करण्यात आली.
शहापूर तालुका कार्यालयातील कर्मचारी उमाकांत हळ्ळी यांच्या कलबुर्गीतील अक्कमहादेवी कॉलनीतील निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. त्यांच्या निवासस्थानी आढळलेली महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन पडताळणी केली जात आहे. मंगळूरमधील सर्वेक्षण पर्यवेक्षक मंजुनाथ, विजापूरमधील डॉ. बी. आर. आंबेडकर विकास निगमच्या जिल्हा व्यवस्थापक रेणुका सातार्ले यांच्या निवासस्थानासह कार्यालयांवरही छापे टाकून तपासणी करण्यात आली.
लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील होसकोटे तालुक्यातील बोदनहोसहळ्ळी येथील द्वितीय श्रेणी साहाय्यक अनंतकुमार यांच्या आलिशान बंगल्यावर छापा टाकला. देवनहळ्ळी आणि होसकोटे येथील भूमंजुरी विभागात काम करणाऱ्या अनंतकुमार यांच्या निवासस्थानी आढळलेले घबाड पाहून लोकायुक्त अधिकारी अचंबित झाले. अनंतकुमार यांच्याजवळ 21 लाख रु. किमतीचे 300 ग्रॅम सोने, 3 लाख रु. किमतीच्या 3.5 किलो चांदीच्या वस्तू, 3 लाख रुपये रोख आणि 3 वाहने तसेच इतर मालमत्ता आढळली आहे.
कोणकोणत्या अधिकाऱ्यांवर छापे...
- राजशेखर-योजना संचालक, निर्मिती केंद्र, तुमकूर
- मंजुनाथ-सर्वेक्षण पर्यवेक्षक, मंगळूर
- रेणुका- डॉ. आंबेडकर विकास मंडळाचे अधिकारी, विजापूर
- मुरली टी. व्ही.-अतिरिक्त संचालक, शहर व ग्रामीण योजना संचालनालय, बेंगळूर
- एच. आर. नटराज-निरीक्षक, कायदा मापनशास्त्र, बेंगळूर
- अनंतकुमार-द्वितीय श्रेणी साहाय्यक, बेंगळूर ग्रामीण
- उमाकांत-शहापूर तालुका कार्यालय, यादगिरी