सदलग्याच्या तोतया लोकायुक्ताला अटक
पोलिसांची कोल्हापुरात कारवाई : 3 मोबाईल, 9 सीमकार्ड जप्त
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील तोतया लोकायुक्त अधिकाऱ्याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ऐजूर पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यात त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून संपूर्ण राज्यात तो लोकायुक्त अधिकारी म्हणून वावरत होता. मुरग्याप्पा निंगाप्पा कुंभार (वय 57), राहणार सदलगा, ता. चिकोडी असे त्याचे नाव आहे. रामनगर जिल्ह्यातील महिला व बालकल्याण खात्याच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधून ‘आपण लोकायुक्त पोलीस उपअधीक्षक आहोत. तुमच्यावर अनेक तक्रारी आहेत. चौकशी होऊ नये असे वाटत असेल तर प्रकरण मिटवून घ्या’ असे सांगत मुरग्याप्पाने पैशाची मागणी केली होती. सुरेंद्र नामक अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून रामनगर जिल्ह्यातील ऐजूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता.
लोकायुक्तांच्या नावे सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणारा कोण? याचा तपास पोलिसांनी हाती घेतला असता मुरग्याप्पाचे नाव उघडकीस आले. मोबाईल टॉवर लोकेशनवरून कोल्हापूर जिल्ह्यात त्याला ताब्यात घेण्यात आले. 27 जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळजवळ विजापूर पोलिसांनी मुरग्याप्पाला अटक केली होती. या प्रकरणातून जामिनावर बाहेर पडल्यानंतर मुरग्याप्पाने पुन्हा आपला जुनाच उद्योग सुरू केला. त्याच्यावर 57 हून अधिक गुन्हे राज्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. पोलिसांनी मुरग्याप्पाला ताब्यात घेतले, त्यावेळी त्याच्याजवळून तीन मोबाईल संच, 9 सीमकार्ड जप्त केली आहेत. मुरग्याप्पा हा बडतर्फ पोलीस हवालदार असून मुद्देबिहाळ केबीजेएनएल उपविभागाचे साहाय्यक कार्यकारी अधिकारी अशोक बिरादार यांच्याकडे 70 हजारांची मागणी केल्याच्या आरोपावरून त्याला विजापूर पोलिसांनी अटक केली होती.