राजद खासदार अभय सिन्हांना लोकसभा अध्यक्षांची फटकार
नवी दिल्ली :
संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून यादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे बुधवारी एका प्रकारामुळे संतप्त झाल्याचे दिसून आले. सभागृहात छायाचित्रे काढणारे राजद खासदार अभय सिन्हा यांच्यावर ओम बिर्ला नाराज झाले. आज तुम्ही छायाचित्रे काढली आहेत, परंतु यापुढे छायाचित्रे काढली तर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवा अशा शब्दांत बिर्ला यांनी त्यांना फटकारले आहे.
सभागृहाचे कामकाज सुरू असताना काही खासदार संसदेत छायाचित्रे काढून घेत होते. याचमुळे लोकसभा अध्यक्ष बिर्ला नाराज दिसून आले. संसदेत छायाचित्रण आणि व्हिडिओ रिकॉर्डिंग करण्यावरून अत्यंत कठोर नियम आहेत. सभागृहात कुठलाही खासदार, पत्रकार किंवा अन्य व्यक्तीला मोबाइल किंवा कॅमेऱ्याने छायाचित्रे काढणे, व्हिडिओ रिकॉर्डिंग करण्याची अनुमती नसते. सभागृहाचे कामकाज केवळ लोकसभा टीव्ही, राज्यसभा टीव्ही किंवा संसद सचिवालयाकडून अधिकृत कॅमेरेच रिकॉर्ड करतात. कुठल्याही अन्य उपकरणाद्वारे रिकॉर्डिंग करण्यास पूर्णपणे बंदी आहे. सभागृहात मोबाइलचा कॅमेरा ऑन करणे, सेल्फी घेणे किंवा कुठल्याही प्रकारची छायाचित्रे काढण्याच्या प्रयत्नाला आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाते आणि याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभा सभापतींकडून तत्काळ कारवाई केली जाऊ शकते.