For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा प्रिमियर लिग

06:21 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभा प्रिमियर लिग
Advertisement

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडे उमेदवारांची वानवा असताना, दुसरीकडे आपल्या सोयीनुसार पक्ष स्थानिक पातळीवर केवळ इलेक्टीव्ह मेरीटचा आधार घेऊन, आपल्या पक्षात खेचताना दिसत आहेत. उमेदवार पण पक्ष नेता पक्षाची विचारधारा यापेक्षा आपले राजकीय अस्तित्व कायम राहण्यासाठी कधी पक्ष बदल तर कधी चिन्ह बदलताना निवडणुकीत उतरताना दिसत आहेत. म्हणजेच आयपीएलच्या धर्तीवर राज्यात सध्या लोकसभा प्रिमियर लिग होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Advertisement

राज्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यातील 26 एप्रिल रोजी होणाऱ्या बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ-वाशिम या जागांसाठी मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांची जवळपास घोषणा झाली असून, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघासाठी अद्याप शिवसेना शिंदे गटाने उमेदवार जाहीर केलेला नाही तर परभणी लोकसभा मतदार संघातून रासपचे महादेव जानकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने जागा सोडली आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघासाठी महायुतीच्या उमेदवाराची अद्याप घोषणा झालेली नाही, अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे. या मतदार संघातून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी गेली अनेक टर्म प्रतिनिधीत्व केलेले असताना अद्याप त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही, ज्यांनी नरेंद्र मोदी यांना स्वत: राखी बांधली त्यांच्या नावाबाबत अद्याप घोषणा न होणे, तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या 2019 ला पुरस्कृत होत्या. गेल्या आठवड्यात त्यांनी एका दिवसात आपल्या स्वत:च्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करत आपली उमेदवारी भाजपकडून जाहीर कऊन घेतली तर परभणीतून साताऱ्यातील महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे जानकर हे माढा किंवा बारामतीतून इच्छुक असताना त्यांना पध्दतशीरपणे या दोन मतदार संघातून बाजुला करत त्यांना बनी तो बनी नही तो परभणी करत परभणी मतदार संघातून महायुतीने उमेदवारी देऊन जानकर यांची बोळवण केली आहे, तर दुसरीकडे भाजपसोबत असलेल्या इतर मित्रपक्षांपैकी आरपीआय किंवा सदाभाऊ खोत यांना कोणालाच उमेदवारी दिलेली नाही. कधी काळी भाजपसोबत राहणाऱ्या आणि मराठा समाजाचे नेते असणाऱ्या शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या पक्षाला देखील उमेदवारी दिलेली नाही.

Advertisement

महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपवर हावी झाले असून शिंदेंपेक्षा पवार यांनी लोकसभेच्या अधिकच्या जागा पदारात पाडून घेतल्या आहेत.  शिंदेंसोबत 13 खासदार आले होते. त्यातील 8 खासदारांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झाली असून त्यात रामटेकचे कृपाल तुमाणे यांचा पत्ता कट झाला असून, अद्याप विद्यमान 5 खासदारांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह असून त्यात ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे, तर 2019 ला पडलेल्या आणि शिंदेसोबत गेलेल्या आनंदराव अडसुळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापैकी केवळ आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश कऊन उमेदवारी जाहीर झाली आहे.

आनंदराव अडसुळ हे शिवसेनेतील लोकसभेचे गटनेते होते, त्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध होते. मोदी अडसुळांच्या प्रचाराला अमरावती येथे 2019 ला आले होते, मात्र शिंदेसेनेसोबत गेल्यानंतर अडसुळांचे वजन कमी झाले की गेल्या 5 वर्षात नवनीत राणाचे वाढले हा मोठा प्रश्न आहे. 2019 ला शिवसेनेत पराभूत झालेले आणि सध्या उध्दव ठाकरेंसोबत असलेल्या चंद्रकांत खैरे आणि अनंत गीते यांना पुन्हा एकदा त्याच मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे.

ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाबाबतचा तिढा सुटला असून ठाण्यातून संजीव नाईक हे शिवसेनेच्या धनुष्य बाणावर लढणार आहेत, तर पालघर लोकसभा मतदार संघात 2019 ला राजेंद गावित हे भाजपचे असताना धनुष्य बाणावर लढले होते. आता गावित असणार की अजुन कोण याबाबत पेच कायम आहे. नाशिक लोकसभा मतदार संघाची जागा हे छगन भुजबळ लढणार हे जवळपास अंतिम झाले असून ते कोणत्या चिन्हावर लढणार कमळ की घड्याळ हे लवकरच कळेल.

भारतात काही वर्षापूर्वी देशातील क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जगातील खेळाडुंचा समावेश असलेल्या आयपीएल नावाचे एक नवीन व्यासपीठ मिळाले होते, या आयपीएलमध्ये एक टीम ज्यात सर्व देशातील खेळाडुंचा समावेश केला जातो. त्याच पध्दतीने सध्या राज्यातील राजकीय पक्ष लोकसभा निवडणूक लढवताना दिसत आहेत. म्हणजेच आढळराव पाटील शिवसेनेचे मात्र लढणार घड्याळावर, संजीव नाईक भाजपचे पण लढणार धनुष्य बाणावर तर अमर काळे यांनी हाताचा पंजा सोडत तुतारी हातात धऊन वर्ध्यातून राष्ट्रवादीतून उमेदवारी घेतली आहे, तर दोनच दिवसापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे शिवसेनेत प्रवेश करत राजू पारवे यांनी रामटेकमधून शिवसेनेचे तिकीट घेतले कधी काळी उत्तर मुंबईतून काँग्रेसचे खासदार राहिलेले अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी पाहता राजकीय पक्षांना विचारधारेला, नेत्यांना, तत्वांना महत्त्व राहिले नसून आता आपल्यासाठी कोणती टीम आणि कोणते मैदान महत्त्वाचे आहे, हे पाहून उमेदवार निर्णय घेत आहे. संघाचे मालक त्यांना खेळण्यासाठी नव्हे तर लढण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. राज्यात राजकीय पक्षांची पडलेली शकले पाहता, राज्याच्या राजकारणात कधी नव्हे ती या लोकसभा निवडणुकीत उलथापालथ होताना दिसत आहे. या निवडणुकीकडे केवळ एक सामना म्हणून बघत असताना कोणत्याही प्रकारे आपला उमेदवार कसा विजयी होईल या एकाच क्रायटेरीयावर सगळा खेळ सध्या सुरू आहे.

सध्याच्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता पक्ष महत्त्वाचा नाही, उमेदवार महत्त्वाचा नाही तर केवळ चिन्ह महत्त्वाचे आहे. कोणत्या चिन्हावर लढणार यावरच सध्या अनेक मतदार संघात प्रश्नचिन्ह असल्याने अनेक जागांबाबतचे घोडे अडले आहे. पहिल्या टप्प्यातील रामटेकच्या काँग्रेस उमेदवार डॉ. रश्मी बर्वे यांना जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्याने ऐनवेळी काँग्रेसकडून जाहीर झालेली उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसने त्यांच्या पतीला ऐनवेळी अधिकृत उमेदवार जाहीर करणे, पहिल्या टप्प्यात केवळ पाच जागांसाठी होणाऱ्या लढतीत इतके व्ट्सि्ट निर्माण होत असेल तर पुढील चार टप्प्यात अनेक धक्कातंत्र जनतेला कधी नव्हे ते या निवडणुकीत बघायला मिळेल. भविष्यात अशीच राजकीय परिस्थिती राहिली तर लोक आयपीएल खेळाप्रमाणेच लोकसभा निवडणुकीकडे एक खेळ म्हणून बघतील यात शंका नाही.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.