For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संमिश्र यशाचा आनंद देणारी लोकसभा निवडणूक

06:29 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
संमिश्र यशाचा आनंद देणारी लोकसभा निवडणूक
Advertisement

रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही मतदारसंघात उबाठा सेनेचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. राज्यात इंडिया आघाडीचा विजयोत्सव साजरा करत असताना कोकणात अत्यंत जिव्हारी लागणारे बोचरे अपयश उबाठाच्या वाट्याला आले. तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेला मात देत कोकणात कमळ फुलवण्याचे भाजपचे स्वप्न साकार झाले खरे. पण राज्यातील एकूणच पिछेहाटीमुळे कोकणातील हा विजय भाजपसाठी तितकासा गोड झाला नाही असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

Advertisement

लोकसभा निवडणुकीचे निकाल असे लागले आहेत की, स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ताधारी भाजप पूर्णत: समाधानी नाहीय. देशभरात मोठी मुसंडी मारूनही बहुमताचा आकडा गाठता न आल्याची खंत काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला आहे. महाराष्ट्रात इंडिया आघाडीला अभूतपूर्व यश मिळवून देण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सिंहाचा वाटा उचलला. मुंबईत उबाठा सेनेने 3 जागा जिंकल्या. पण त्यांचा कोकणचा बालेकिल्ला मात्र यावेळेस ढासळला. रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोही मतदारसंघात उबाठा सेनेचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. राज्यात इंडिया आघाडीचा विजयोत्सव साजरा करत असताना कोकणात अत्यंत जिव्हारी लागणारे बोचरे अपयश उबाठाच्या वाट्याला आले. तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेला मात देत कोकणात कमळ फुलवण्याचे भाजपचे स्वप्न साकार झाले खरे. पण राज्यातील एकूणच पिछेहाटीमुळे कोकणातील हा विजय भाजपसाठी तितकासा गोड झाला नाही असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

उद्धव ठाकरे हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खरे वारसदार आहेत, असे मानणाऱ्या मतदारांसाठी लोकसभा निवडणूक ही मोठी संधी होती. या संधीचे सोने करताना मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचा प्रयत्न केला आणि कमी-अधिक प्रमाणात त्याला यशही आले. मुंबईत शिवसेनेला चांगले यश मिळाले. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दृष्टीने ही अतिशय जमेची बाजू मानली जात आहे. पण कोकणातील रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन महत्त्वाच्या जागांवर झालेला पराभव पक्षनेतृत्वाच्या जिव्हारी लागणारा असाच आहे. पारंपरिक मित्रपक्ष भाजपचे शिवसेनेप्रती असलेले मनसुबे ठीक दिसत नसल्याचे लक्षात येताच ठाकरेंनी पाच वर्षांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. ठाकरे सोबत आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला  मोठे बळ मिळाले. यंदाच्या लोकसभेत त्याचा मोठा फायदा मरगळलेल्या काँग्रेसला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झाला. महाराष्ट्रात काँग्रेस 13 जागा जिंकली तर 80 च्या स्ट्राईक रेटने राष्ट्रवादीने 8 जागांवर घवघवीत यश संपादन केले. उबाठाला मात्र सर्वाधिक 21 जागा लढवून केवळ 9 जागा जिंकता आल्या. अर्थात नवे पक्षचिन्ह घेऊन उद्धव ठाकरे मैदानात उतरले होते, ही गोष्ट मान्य करावी लागेल. उबाठा सेनेने कोकणातील दोन जागांसह राज्यात अन्यत्र आणखी काही जागा जिंकल्या असत्या तर आज महाविकास आघाडीतील मोठा भाऊ बनण्याचा मान त्यांना नक्कीच मिळाला असता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या वाटाघाटींमध्ये ते खूप महत्त्वाचे ठरले असते. त्यातच कोकणातील दोन्ही जागांवरील पराभव हा उबाठासाठी मोठ्या चिंतेचा विषय आहे. इंडिया आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळताना कोकणकडे ठाकरेंचे थोडे दुर्लक्ष झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता या पराजयांची कारणमीमांसा करत उबाठाने उत्तर रत्नागिरी पक्षसंघटनेत खांदेपालट करायला सुरूवात केली आहे. पण त्यातून पक्षसंघटनेत कुठलेही नवे पेच निर्माण होणार नाहीत, याची काळजीदेखील ठाकरेंना घ्यावी लागणार आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीत उबाठाच्या दृष्टीने अत्यंत जमेची बाजू म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड, गुहागर, चिपळूण-संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापूर-लांजा या पाचही मतदारसंघामध्ये उबाठाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळालेले आहे. पण बऱ्याचदा विधानसभेची समीकरणे ही वेगळी असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी उद्योगमंत्री उदय सामंत (रत्नागिरी), योगेश कदम (दापोली) हे दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. तर तिसरे आमदार शेखर निकम (चिपळूण) उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहेत. भास्कर जाधव (गुहागर) आणि राजन साळवी (राजापूर) उद्धव ठाकरेंसोबत आहेत. सिंधुदुर्गातून शिक्षणमंत्री दीपक केसरकर (सावंतवाडी) हे शिंदे गटात आहेत तर कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक ठाकरेंच्या सेनेत आहेत. यापैकी दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंना आपल्या मतदारसंघातून 32 हजाराचे मताधिक्य दिले आहे. तर वैभव नाईक यांचा मतदारसंघ पोखरून काढताना राणेंनी तब्बल 26 हजाराचे मताधिक्य घेतले आहे. हेच मताधिक्य राणेंच्या 47 हजाराच्या विजयात ‘टर्निंग पॉईंट’ ठरले. दहा वर्षांनी पुन्हा एकदा राणे ‘विनिंग ट्रॅक’वर आल्यामुळे साहजिकच त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर राणे आता विधानसभा निवडणुकीत उबाठासमोर कडवे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करतील, यात शंका नाही. त्यामुळे महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे नेतृत्व करत असताना उद्धव ठाकरेंना कोकणातील जागांवर खूप बारकाईने लक्ष ठेवावे लागणार

आहे.

कोकणचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक खास राहिली. आपल्या राजकीय कारकिर्दीत ते प्रथमच लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले होते. भाजपच्या कमळ चिन्हावर लढत असताना उबाठा सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांचे तगडे आव्हान त्यांच्यासमोर होते. राणेंसाठी ही निवडणूक तेवढी सोपी नव्हती. कारण तुलनात्मकदृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्यात उबाठा सेना अतिशय मजबूत आहे. शिवाय यावेळेस उबाठाच्या सोबतीला काँग्रेस होती. हे सारे बलाबल पाहता विजयासाठी राणेंना त्यांच्या ‘होमपिच’वर म्हणजेच सिंधुदुर्गात मोठे मताधिक्य घ्यावे लागणार होते आणि त्याचवेळी उबाठा सेनेचे रत्नागिरीतील मताधिक्य बऱ्याच प्रमाणात कमी करावे लागणार होते. अनुभवी राणेंनी ही दोन्ही आव्हाने लीलया पेलली अन् 47 हजार मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले. तब्बल 10 वर्षानंतर त्यांनी निवडणुकीतील विजय साजरा केला. व्यक्तीश: राणेंना हा विजय खूप आनंद देणारा ठरला. राणेंना मोठ्या अपेक्षेने त्यांना मतदान करणारे कोकणवासीयसुद्धा त्यांच्या विजयाने सुखावले. कारण केंद्रात तिसऱ्यांदा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यास राणे मंत्री होतील आणि मतदारसंघातील विकासाचे प्रश्न वेगाने हाती घेतील, या अपेक्षेने त्यांना अनेकांनी मतदान केले होते. मात्र ‘एनडीए 3.0’ च्या मंत्रीमंडळात राणेंना स्थान न मिळाल्यामुळे या सर्वांची निराशा झाली आहे. कारण मंत्रीपदाचा एक रुबाब असतो. अधिकारवाणीने आपण काही गोष्टी करू शकतो. पण कोकणात प्रथमच कमळ फुलवूनदेखील मंत्रीपदाची माळ राणेंच्या गळ्यात पडलेली नाही.

आता राज्यातील एक ज्येष्ठ नेते आणि खासदार म्हणून मतदारसंघाच्या विकासाबरोबरच भाजप महायुतीच्या जास्तीत-जास्त जागा जिंकून देण्याचे दुहेरी आव्हान राणेंसमोर असेल. मंत्रीपदी वर्णी न लागल्याने राणेंना डिवचण्याचे काम  विरोधकांनी सुरू केले आहे. या साऱ्या परिस्थितीला आक्रमक स्वभावाचे राणे कसे सामोरे  जातात, हे पहावे लागेल. खासदार सुनील तटकरे हेदेखील कोकणातील एक मोठे राजकीय नाव. तटकरे या खेपेस 81 हजाराच्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले  आहेत. त्यांच्या पाठीशी अतिशय दांडगा राजकीय अनुभव आहे. त्यांनासुद्धा मंत्रीपदाची अपेक्षा होती. पण तीदेखील फोल ठरली. लोकसभेत मनाजोगा विजय संपादन करूनदेखील मंत्रीपदाच्या शर्यतीत राणे आणि तटकरे यांची अखेर निराशाच झालीय. एका अर्थाने त्यांच्यासाठीही यंदाची लोकसभा निवडणूक संमिश्रच ठरली.

महेंद्र पराडकर

Advertisement
Tags :

.