कोतवाल गल्लीत भाजीविक्रेत्यांना स्थानिकांचा विरोध
बेळगाव : कोतवाल गल्लीत बसून भाजीविक्री व्यवसाय करणाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. अंत्यसंस्कार त्याचबरोबर इतर कामे करताना स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने गुरुवार दि. 20 रोजी भाजीविक्रेत्यांना रहिवाशांनी बसण्यास विरोध केला. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका व बैठे विक्रेते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कोतवाल गल्लीतील भाजीविक्रेत्यांना त्या ठिकाणी बसू नये अशी सूचना केली.
शहर व उपनगरात बैठे विक्रेते आणि फेरीवाल्यांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. पण अद्यापही त्याला म्हणावे तसे यश आलेले नाही. मनमानी पद्धतीने बैठे विक्रेते जागा मिळेल त्या ठिकाणी बसत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्याचबरोबर याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत आहे. भाजी विक्रेत्यांकडून उरलेला भाजीपाला व ओला कचऱ्याचे योग्यरित्या विल्हेवाट लावले जात नाही अशा तक्रारी आहेत. ओला कचरा रस्त्याच्या कडेला किंवा स्थानिक नागरिकांच्या घरासमोर टाकून दिला जात आहे.
त्यामुळे कोतवाल गल्लीत भाजीविक्री करणाऱ्यांना स्थानिकांनी विरोध केला आहे. अंत्यविधी किंवा इतरवेळी भाजीविक्रेत्यांमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गुरुवारपासून कोतवाल गल्लीत भाजीविक्री करण्यात येऊ नये, अशी सूचना स्थानिकांनी केल्याने या पार्श्वभूमीवर नगरसेविका मुल्ला व बैठे विक्रेते असोसिएशनच्यावतीने कोतवाल गल्लीतील भाजीविक्रेत्यांना सक्त सूचना करण्यात आली.