लोबोंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा रितेश नाईक यांना पाठिंबा, खलबते सुरू : भाजपसमोर पेच
पणजी : कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय क्षेत्रात नव्याने खलबते सुरू झाली आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे ठरविले आहे. त्यामुळे मगोचे फोंड्याचे मागील उमेदवार डॉ. केतन भाटीकर हे नाराज झाले आहेत. दरम्यान कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वाढली आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपण युतीचा धर्म पाळणार, असे जाहीर केले आहे.
फोंडा राखणे भाजला शक्य होईल
दैनिक तरुण भारतशी बोलताना ढवळीकर यांनी सांगितले की आम्ही निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे. त्याच अनुषंगाने आम्ही रितेश नाईक यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ. रवी नाईक यांचे कार्य पाहता रितेश यांना फोंडा मतदारसंघातून सहानुभूती प्राप्त होईल. त्याचबरोबर मगो पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. त्यामुळे भाजपला ही जागा आपल्या ताब्यात ठेवण्यास सोपे जाईल. प्रश्न केवळ एक वर्ष चार महिन्यांचा आहे. त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीस आम्हाला सामोरे जायचे आहे. त्यासाठी रवी नाईक यांचे जे उर्वरित दीड वर्ष होते ते त्यांच्या चिरंजीवांना निवडून आणून पूर्ण करणे शक्य होईल, असेही ढवळीकर म्हणाले.
भाजपसमोर नाही पर्याय
ढवळीकर यांनी भाजपला तथा रवी नाईक यांच्या पुत्राला जोरदार पाठिंबा जाहीर केल्यामुळे सहाजिकच भाजपला देखील आता रितेश यांना उमेदवारी देण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. रितेश हे फोंड्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. रवींच्या बरोबर त्यांनी फोंडा मतदारसंघात बरेच काम केलेले आहे. भाजपने अद्याप पत्ता खोललेला नाही. रवींच्या पुत्राला उमेदवारी द्यायची की नाही, हे पक्ष लवकरच ठरविणार आहे. भारतीय जनता पक्ष घराणेशाहीत पूर्णत: अडकलेला असल्यामुळे नाईक यांच्या पुत्राला उमेदवारी देणे त्यांना फारसे कठीण होणार नाही.
काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
सत्ताधारी भाजप फोंड्याची जागा बिनविरोध निवडून यावी यासाठी प्रयत्न करणार आहे. परंतु काँग्रेस पक्ष नेमकी कोणती भूमिका बजावतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. केतन भाटकर यांना देखील ही पोटनिवडणूक लढवायची आहे. मात्र मगो पक्षाने पाठिंबा दिला नाही किंवा पक्षाची उमेदवारी दिली नाही तर केतन भाटीकर नेमकी कोणती भूमिका घेतील, याकडे देखील साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 2019 मध्ये सुभाष शिरोडकर यांनी शिरोड्यातून विधानसभेची पोटनिवडणूक भाजपच्या उमेदवारीवर लढविली होती. त्यावेळी मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी तिथून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आणि उमेदवारी अर्ज देखील भरल्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मगो पक्षात फूट पाडून दोन आमदारांना मध्यरात्रीच्या सुमारास भाजपमध्ये प्रवेश दिला. तत्कालीन उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून वगळले होते. यावेळी मात्र अचानक फोंडामध्ये निर्माण झालेल्या विधानसभेच्या रिक्त जागेसाठी मगोने माघार घेऊन आपला पाठिंबा रवी नाईक यांच्या पुत्राला जाहीर केला आहे. एकंदरीत फोंडा विधानसभा मतदारसंघावरून गोव्यातील राजकारण बरेच रंगण्याची शक्यता आहे. भाजपने अद्याप पत्ते खोललेले नाहीत मात्र भाजपवर देखील भंडारी समाजाकडून रितेश नाईक यांना उमेदवारी देण्यासाठी दबाव येत आहे.
डॉ. केतन भाटीकरांचे काय?
मगो पक्षाचे गेले काही वर्षे फोंडा मतदारसंघात जोरदार कार्य करणारे आणि मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले डॉ. केतन भाटीकर यांनी कोणत्याही परिस्थितीत आता फोंडा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली आहे. रवी नाईक यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा सहा महिन्याच्या आत भरायची असल्याने या निवडणुकीसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी त्यांची मगो पक्षाकडे मागणी होती, मात्र पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी रितेश नाईक यांना भाजपचा उमेदवार म्हणून मगो पक्ष पाठिंबा देईल, असे जाहीर केल्याने भाटीकरसह भाजपसमोरही पेच निर्माण केला आहे.
मायकल लोबो यांना मंत्रीपद ?
रवी नाईक यांच्या निधनाने फोंडा तालुक्यातील आणखी एक मंत्रीपद गेले आहे. फोंडा तालुक्याला मंत्रिमंडळात 100 टक्के स्थान प्राप्त झाले होते. गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर व रवी नाईक यांचे निधन झाल्यामुळे फोंड्यातील चारपैकी आता केवळ दोन मंत्रीपदे शिल्लक राहिली आहेत. दोन महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाची पुनर्रचना होताना मायकल लोबो यांना स्थान मिळाले नव्हते, मात्र आता लवकरच हे रिक्त पद भरले जाणार आहे. लोबो यांना मंत्रिमंडळात स्थान प्राप्त होईल.