लोबोंचा सरकारला घरचा आहेर!
बहुमत असतानाही विधेयके मागे घेल्याने व्यक्त केली नाराजी
पणजी : सत्ताधारी पक्षाकडे 33 आमदार असतानाही विधानसभागृहात सादर केलेली 4 विधेयके मागे घेण्याची नामुष्की सावंत सरकारवर ओढवणे या प्रकाराने निश्चितच सरकारमध्ये जे काही चाललेय ते योग्य नाही, व तशी लक्षणे दिसत आहेत असे निवेदन कऊन कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, त्यांच्या निवेदनाची गंभीर दखल प्रदेश भाजप अध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी घेतली असून पक्षाच्या शिस्तीमध्ये रहा, असा इशारा त्यांनी दिला आहे. राज्य सरकारच्या सत्तापक्षात चालू असलेली खदखद मायकल लोबो यांच्या निवेदनाने उघड झाली. सोमवारी काही पत्रकारांशी बोलताना कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो यांनी सरकारवर बॉम्ब गोळा फेकला.
आपण सत्तेवर आहोत. तब्बल 33 आमदारांचे बळ आहे, असे असताना घाबरता कोणाला? असा सवाल त्यांनी केला. 33 एवढे प्रचंड मजबूत संख्याबळ असताना देखील सरकारची सभागृहात सादर केलेली 4 विधेयके माघार घेण्याची पाळी सत्ता पक्षावर यावी हा प्रकार निश्चितच गंभीर विचार करण्यासारखा आहे. सरकारमध्ये जे काही चाललेय ते बरोबर नाही. विधानसभेत ती विधेयके येऊ द्यायला हवी होती. विरोधी पक्षांना जर त्यात दुऊस्त्या सूचवायच्या असतील तर सुचवू द्या. मात्र अचानक माघार घेण्याची पाळी आली, यामुळे जनतेत चुकीचा संदेश पोहोचला, असेही ते म्हणाले.
शिस्तीने वागा : तानावडे यांचा इशारा
मायकल लोबो यांच्या निवेदनाचे पडसाद सत्ताधारी गटात उमटले. सायंकाळी प्रदेश भाजप अध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी मायकल लोबो यांचे नाव न घेता सल्ला वजा इशारा दिला की पक्षातील अंतर्गत गोष्ट उघड करण्याचा व जाहीर वाच्यता करण्याचा प्रयत्न कोणी कऊ नये. सध्या नवी दिल्लीला असलेले खासदार तानावडे हे आज मंगळवारी गोव्यात येत आहेत. आपण गोव्यात आल्यानंतर संबंधितांना बोलावून घेऊन त्यांना याचा जाब विचारणार, असे ते म्हणाले. पक्षात असलेल्या शिस्तीच्या बाबतीत कोणीही तडजोड कऊ शकत नाही. ज्या काही तक्रारी असतील त्या सार्वजनिकरित्या मांडण्याऐवजी पक्षाचे नेते आहेत, व तोच योग्य मंच आहे. सार्वजनिकरित्या असे आरोप करणे योग्य नव्हे. कोणीही अशा तऱ्हेने वर्तन केल्यास ते मुळीच खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा खासदार तानावडे यांनी दिला आहे.