लघु उद्योगासाठी महिलांना कर्ज देणार
बेंगळूर : राज्यातील महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी राज्य सरकार आर्थिक सहकार्य करणार आहे. महिला उद्योजकांना किंवा स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांना राज्य सरकार 3 टक्के व्याजदराने 5 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देईल, असे आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (एफकेसीसीआय)तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक दिनाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. स्वत:चा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देऊन स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी अनेक महिला पुढे येत आहेत.
सरकार अशा विचारसरणीला आणखी प्रोत्साहन देईल. अशा महिलांना वार्षिक 3 टक्के व्याजदराने 5 कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल, असे त्या म्हणाल्या. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने गृहलक्ष्मी योजना जारी केली आहे. सरकारने या योजनेसाठी 32,000 कोटी रुपये निधी दिला आहे. महिलांच्या विकासासाठी सरकार दरवर्षी 52,000 कोटी रुपये खर्च करत आहे. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. माझ्याकडे स्वत:चे दोन साखर कारखाने आहेत. मोठ्या संख्येने महिलांना रोजगार दिला आहे. सर्व क्षेत्रात महिला पुढे येत आहे. त्यासाठी फक्त धाडस दाखविण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी एफकेसीसीआयच्या अध्यक्षा उमा रे•ाr, वरिष्ठ उपाध्यक्ष साई प्रसाद, उपाध्यक्ष बी. पी. शशिधर, डेन्मार्कचे कौन्सिल जनरल पीटर विंटर श्मिट, जपानचे मिहो सक्ता मल्हान आदी उपस्थित होते.