अंगणवाडी केंद्रांमध्येच एलकेजी-युकेजी
मुख्यमंत्र्यांचा निर्णय : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण (एलकेजी-युकेजी) देण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संमती दर्शविली आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. विधानसौध येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यालयात बैठकीनंतर त्या बोलत होत्या. राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांचा दर्जा वाढविण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दर्शविली आहे. कल्याण कर्नाटक भाग वगळता सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये नव्याने पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत तज्ञांचा समावेश असणारी समिती नेमण्यात येणार आहे. दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहार पुरविणे हा सरकारचा हेतू आहे. या उद्देशाने अंगणवाडी केंद्रांचा दर्जा वाढविण्यात येणार आहे. मुलांना महिला-बालकल्याण खात्यामार्फत गणवेश, पुस्तके, बॅग, ट्रान्स्फर सर्टिफिकेट (टीसी) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याच्या हालचाली
दर्जेदार शिक्षण शाळांमधून मिळावे, या हेतूने शिक्षण खात्याने पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, अंगणवाडी सेविकांनी तीव्र विरोध केल्याने अंगणवाडी केंद्रांचा दर्जा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे इंग्रजी आणि कन्नड या दोन्ही भाषांमधून पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचा विचार असल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू करण्यासंबंधी अंगणवाडी सेविकांशी अलीकडेच चर्चा करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या सेविकांपैकी 9 हजार जण पदवीधर आणि 1 हजारहून अधिक जण पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आहेत. दर्जेदार शिक्षणात कोणत्याही अडचणी उद्भवणार नाहीत, कोणालाही सेवेतून कमी केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा, महिला-बालकल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.