झोपडीत 53 वर्षे वास्तव्य
आज प्रत्येकाला शांतता आणि एकांत हवा आहे. शहरातील गजबजलेल्या वातावरणाचा आणि गोंगाटाचा कंटाळा असलेली अनेक माणसे असतात. आपलाही अशा लोकांमध्ये समावेश असू शकतो. मात्र, दुसरा पर्याय नसतो, म्हणून आपल्यापैकी बहुतेकजण अशी जीवनशैली स्वीकारतात. कारण शांत स्थानी घर घेणेही बहुतेकांना परवडण्यासारखे नसते. काही जण मात्र, एकांताच्या शोधात नवीन आणि अभिनय पर्याय शोधतात. या कामात ते यशस्वीही होतात.
ब्रिटनमधील मार्गारेथ नामक महिलेने मन:स्वास्थ्यासाठी एक उपाय शोधून काढला. तिने घनदाट वनातच एक झोपडी बांधली. या झोपडीचे निर्माणकार्य तिने 53 वर्षांपूर्वीचे केले आहे. ही महिला 87 वर्षांची झाली असून आजही ती याच झोपडीत आनंदाने आणि एकटीच वास्तव्य करीत आहे. ही झोपडी तशी फार मोठी नाही. तिचे क्षेत्रफळ अवघे 290 चौरस फूट आहे. तथापि, ती सर्व सुखसोयींनी युक्त आहे. ती लाकडापासून निर्मिलेली असून निसर्गात उपलब्ध असणाऱ्या अन्य साधनसामग्रीचा उपयोग करण्यात आलेला आहे. झोपडीत बसण्यासाठी टेबल किंवा खुर्ची असा शहरी थाट नसून उशा, तक्के अशी मांडणी आहे. मार्गारेथ यांनी या झोपडीत वयाच्या तीशीत असतानाच स्थलांतर केले. आज पाच दशके त्या या झोपडीतच रहात आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक किंवा अन्य लोक या झोपडीतच येतात. मार्गारेथही केवळ नित्योपयोगी साधनसामग्रुच्या खरेदीसाठी शहरात येतात. अन्यथा त्या त्यांच्या या ‘राजवाड्या’तच असतात.