भूकंपानंतर भीतीपोटी गुहेतच वास्तव्य
7.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे सोडले घर
काही घटना माणसाचे आयुष्य बदलून टाकतात. यात एखादी मोठी दुर्घटनाही सामील असू शकते. काही अशीच दुर्घटना एका इसमासोबत घडली आहे. हा इसम स्वत:च्या घरात आरामात राहत होता आणि अचानक आलेल्या भूकंपाने सर्वकाही उद्ध्वस्त झाले. या घटनेचा या इसमाच्या मनावर झालेला परिणाम कुणाच्या कल्पनेपलिकडचा आहे.
भूकंपानंतरचे दृश्य पाहून हा इसम इतका घाबरला की पुन्हा घरात राहण्याची हिंमतच करू शकला नाही. 2 वर्षांपासून हा इसम आता गुहेतच राहत आहे. भूकंप या गुहेचे काहीच बिघडवू शकत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. तुर्कियेचा नागरिक अली बोजोग्लेनचे हे नवे आयुष्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
भूकंपामुळे बदलले जीवन
फेब्रुवारी 2022 मध्ये तुर्कियेत भीषण भूकंप झाला होता. 7.8 तीव्रतेच्या या भूकंपाने अनेक लोकांचे जीवन बदलले. यात अली बोजोग्लेनचा समावेश असून तो तीन अपत्यांचा पिता आहे. दक्षिण तुर्कियेच्या हेतले येथे त्याचे घर होते, जे भूकंपात जमीनदोस्त झाले. या घटनेमुळे अलीचा माणसांकडून निर्मित इमारतींवरील विश्वासच उडाला आहे. आता तो शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका गुहेत राहतो. त्याने गुहेला स्वत:च्या घरात रुपांतरित केले आहे. परंतु त्याचा परिवार त्याच्यासोबत येथे राहण्यासाठी आलेला नाही. तरीही अली यात आनंदी आहे.
गुहेतून बाहेर पडणे टाळतो
2 वर्षांपासून अली येथे राहत आहे, किमान ही गुहा कोसळणार तरी नाही असे त्याचे सांगणे आहे. सरकारकडून त्याला एका चांगला कंटेनर होम देखील देण्यात आला, जो शहरानजीक होता, परंतु अलीने तेथेही राहण्यास नकार दिला. तो शहर अन् तेथील गोंगाटापासून दूर येथे राहतो. स्वत:ची सर्व कामे तो स्वत:च करतो आणि त्याला ही गुहा पसंत आहे. बहुतांश लोकांना त्याचे हे जीवन पसंत नाही, परंतु त्याला यामुळे फरक पडत नाही. ही गुहा हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड रहाते. येथे साप अन् उंदिर येत असतात, परंतु अलीला आता याची सवय झाली आहे. तो स्वत:च्या गरजेनुसार सोलर पॅनेल्सचा वापर करतो आणि फ्रिज, वॉशिंग मशीन आणि इतर गोष्टी वापरत असतो.