मुंडक्याशिवाय अठरा महिने जिवंत
कोणत्याही सजीव मुंडक्याशिवाय किंवा शीरविरहीत परिस्थितीत जिवंत राहू शकत नाही, ही बाब आपल्याला माहीत आहे. कारण सजीवांच्या शीरोभागी मेंदू असतो आणि मेंदूशिवाय शरीर जिवंत राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती असते. तथापि, साधारणत: 80 वर्षांपूर्वी असा एक प्रकार अमेरिकेत घडला आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडो प्रांतात एक कोंबडा मुंडक्याशिवायच 18 महिने जिवंत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद सत्य असून खरोखरच असा एक कोंबडा या प्रांतात होता. त्याने मुंडक्याशिवायच 18 महिने जगून एक इतिहासच निर्माण केला आहे. या जगावेगळ्या कोंबड्याचे नाव होते ‘माईक’.
1945 च्या सप्टेंबर महिन्यात लॉईड ओन्ल्सन यांच्या शेतात हा कोंबडा जन्माला आला. ओल्सन हे कोंबड्यांची कत्तल करुन त्यांचे मांस विकण्याचा व्यवसाय करीत होते. त्यांनी हा कोंबडा मारण्यासाठी त्याचे मुंडके उडविले. तथापि, इतर कोंबड्यांप्रमाणे हा कोंबडा धाराशायी न होता, कोणत्याही अन्य जीवंत कोंबड्याप्रमाणे हालचाली करत राहिला. ते पाहून ओल्सन आश्चर्यचकित झाले. मुंडके उडविल्यानंतरही हा कोंबडा त्याच्या दोन्ही पायांवर उभा होता. तसेच चालणे, पळणे उड्या मारणे आदी हालचाली करीत राहिला. त्यामुळे ओल्सन यांनी त्याचे आणखी तुकडे केले नाहीत. तसे केले असते तर तो निश्चितच मेला असता. तथापि, तसे नकरता त्यांनी त्याला जिवंत ठेवले. हा कोंबडा पुढे तब्बल 18 महिने जिवंत राहिला. सर्वसामान्यांच्या दृष्टीने हा आजही चमत्कारच आहे. तथापि, शास्त्रज्ञांनी यामागचे कारण स्पष्ट केले आहे. कोंबड्याचा मेंदू डोक्याच्या काहीसा मागच्या बाजूला असतो. ओल्सन यांनी या कोंबड्याचे मुंडके कापले तेव्हा, मुंडक्याचा आणि गळ्याचा थोडासा भाग सुरक्षित राहिला होता. तसेच त्याचा मेंदूपर्यंत घाव बसला नव्हता. त्यामुळे तो ठार झाला नाही. त्याचा मेंदू सुरक्षित राहिल्याने तो पुढे काही महिने जिवंत राहिला हे सत्य वैज्ञानिकांनी दाखवून दिले.