केएलईमध्ये लिव्हर रोपण शस्त्रक्रिया यशस्वी
प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये प्रथमच हयात मुलाने आपल्या वडिलांना लिव्हर दान केले असून त्याच्या वडिलांवर लिव्हर रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र व गोव्यामध्ये प्रथमच अशा प्रकारचे लिव्हर रोपण झाले असल्याची माहिती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली.
केएलई हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आजपर्यंत हॉस्पिटलने 101 किडनी रोपण शस्त्रक्रिया, 21 लिव्हर रोपण शस्त्रक्रिया व 14 हृदय रोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. तज्ञ डॉ. आणि नर्सिंग स्टाफ व परवडणारे दर हे केएलई हॉस्पिटलचे वैशिष्ट्या आहे. अन्य मेट्रो सिटींमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी मोठा खर्च येतो. मात्र, आमचे स्वत:चे हॉस्पिटल असून येथील ऑपरेशन थिएटर हायटेक आहे. शिवाय रुग्ण आणि कुटुंबीयांच्या राहण्याची सोय हॉस्पिटलमध्ये होत असल्यामुळे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया रुग्णांना परवडू शकतात.
केएलईच्या गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. संतोष हजारे म्हणाले की, रायबाग तालुक्यातील एका 56 वर्षीय शेतकऱ्याला ‘फॅटी लिव्हर’चा त्रास होता. वडिलांना होणारा त्रास पाहून तो कमी करण्यासाठी त्याच्या 29 वर्षीय मुलाने लिव्हर दान करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया, सरकारी परवानगी पूर्ण करून आठ दिवसांपूर्वी लिव्हर रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शस्त्रक्रिया बेंगळूरच्या अॅस्टर हॉस्पिटलचे प्रमुख लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. सोनल अस्थाना व त्यांचे सहकारी डॉ. वचन हुक्केरी, डॉ. रोमेल एस., केएलई हॉस्पिटलमधील सुदर्शन चौगुले, डॉ. किरण उरबेनट्टी यांनी यशस्वी केली. या शस्त्रक्रियेसाठी 10 तासांचा कालावधी लागला. भूलतज्ञ डॉ. अरुण व्ही., डॉ. राजेश माने, डॉ. मंजुनाथ पाटील, डॉ. रूपा एम. एन. यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली. त्यांना समन्वयक वैशाली साबळे व रुद्रेश हिरेमठ, तसेच समुपदेशक डॉ. गीता देसाई व बसवराज मजट्टी यांचे सहकार्य लाभले, असे डॉ. हजारे यांनी सांगितले.
डॉ. सोनल अस्थाना म्हणाले, आम्ही केलेली ही 22 वी लिव्हर रोपण शस्त्रक्रिया आहे. दात्याच्या लिव्हरचा 62 ते 65 टक्के भाग काढून त्याचे रुग्णावर रोपण केले जाते. त्यानंतर काही आठवड्यातच दोघांच्याही लिव्हर पूर्ववत कार्यान्वित होतात. लहान मुलांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी 30 ते 40 टक्के व मोठ्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी 60 ते 70 टक्के लिव्हरचा भाग लागतो. काही दिवसातच दोघेही आपले जीवन पूर्ववत जगू शकतात.
डॉ. सुदर्शन चौगुले म्हणाले, लिव्हर खराब होण्यासाठी मद्यपानापेक्षा आज बैठ्या जीवनशैलीमुळे ‘फॅटी लिव्हर’चा धोका अधिक वाढतो आहे. त्यामुळे जीवनशैलीमध्ये बदल आणि व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. याप्रसंगी क्लिनिकल सर्व्हिस विभागाचे संचालक डॉ. माधव प्रभू, ओटीचे प्रशासक डॉ. बसवराज बिज्जरगी, ब्लड बँकेचे डॉ. विरगी उपस्थित होते.
जीवदान मिळाल्याची भावना
लिव्हर दान केलेला मुलगा आणि वडील दोघेही पत्रकार परिषदेत उपस्थित होते. डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. संतोष हजारे व इतर सर्व डॉक्टरांमुळे आपल्याला जीवदान मिळाल्याची भावना वडिलांनी व्यक्त केली. या दोघांचाही डॉ. कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.