18वर्षांपासून विमानतळावर होते वास्तव्य
पॅरिसमध्ये अलिकडेच झाले निधन
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील चार्ल्स डी गॉल विमानतळावर 18 वर्षांपर्यंत वास्तव्य करणाऱया इराणी व्यक्तीचे शनिवारी विमानतळावरच निधन झाले आहे. 2004 साली स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा चित्रपट ‘द टर्मिनल’ याच व्यक्तीवर बेतलेला होता.
मेहरान करीमी नासेरी यांचे विमानतळाच्या टर्मिनल 2एफमध्ये शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. एका वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार केले, परंतु त्यांना वाचविता आले नसल्याचे अधिकाऱयाने सांगितले आहे. करीम नासेरी 1988-2006 पर्यंत विमानतळाच्या टर्मिनल 1 मध्ये वास्तव्य करून होते. पूर्वी विमानतळावरील त्यांच्या वास्तव्याचे कारण कायदेशीर पेच होता, त्यांच्याकडे फ्रान्समध्ये दाखल होण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे नव्हती. परंतु पुढील काळात ते केवळ आवड म्हणून विमानतळावर राहू लागले होते.
वर्षानुवर्षे करीमी हे एका लाल रंगाच्या प्लास्टिक बेंचवर झोपायचे, विमानतळावरील कर्मचाऱयांसोबत त्यांची मैत्री झाली होती. कर्मचाऱयांसाठीच्या स्वच्छतागृहाचा वापर ते आंघोळीसाठी करायचे. ते स्वतःचे रोजनिशी लिहायचे, नियतकालिक वाचयचे आणि ये-जा करणाऱया प्रवाशांचे निरीक्षण करायचे. विमानतळावरील कर्मचाऱयांनी त्याना लॉर्ड अल्प्रेड हे टोपणनाव दिले होते. प्रवाशांमध्ये देखील ते एक मिनी-सेलिब्रिटी ठरले होते. करीमी यांनी 1999 मध्ये असोसिएटेड प्रेसला मुलाखत दिली होती. यात त्यांनी एक दिवस मी या विमानतळावरून निघून जाईन, परंतु सध्या मी पासपोर्ट किंवा ट्रान्झिट व्हिसाची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले होते.
नासेरी यांचा जन्म 1945 मध्ये इराणच्या सुलेमान येथे झाला होता. त्यांचे वडिल इराणी तर आई एक ब्रिटिश होती. 1974 मध्ये इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जाण्याकरता ते इराणमधून बाहेर पडले होते. इराणमध्ये परतल्यावर त्यांना तत्कालीन राज्यकर्त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी तुरुंगात टाकण्यात आले आणि पासपोर्ट रद्द करण्यात आला होता.