जिवंत सापाची भाजी
सध्या एक व्हिडीओ बराच प्रसिद्ध होत आहे. एका हॉटेलाच्या स्वयंपाकघरात चाललेला स्वयंपाक यात दाखविण्यात आलेला आहे. एका जिवंत सापाला कढईत घातले जाते आणि त्याच्यापासून भजी बनविली जाते, असे दृष्य या व्हिडीओत दिसून येते. तो प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. जिवंत सापाची भजी बनविण्याची ही कृती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर अनेकांना संताप अनावर झाला. असंख्य लोकांनी हा व्हिडीओ पाहून अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. असे करणाऱ्या हॉटेलवर आणि त्या स्वयंपाक्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही अनेकांनी केली. पण अखेरीस सत्य समोर आले. वास्तविक, असा प्रकार कोठे झालाच नव्हता. जिवंत सापाला कढईत टाकण्यात आले नव्हते. तसेच त्याची भजीही बनविण्यात आली नव्हती. हा व्हिडीओ ‘कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञाना’च्या (एआय) माध्यमातून बनविण्यात आला होता, असे या व्हिडीओचे सत्य उघड झाल्यानंतर समजून आले. पण तोपर्यंत बराच गोंधळ झाला होता. हा व्हिडीओ इतका जिवंत वाटत होता, की असा प्रसंग खरेच घडला आहे, अशी अनेकांची समजूत झाली होती आणि संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.
आता या व्हिडीओचे सत्य समोर आल्याने तणाव कमी झाला आहे. तथापि, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानचा उपयोग किती भयंकर रितीने करण्यात येऊ शकतो आणि त्यामुळे किती गोंधळ आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे. या तंत्रज्ञानाचे लाभ अनेक असले, तरी त्याचा दुरुपयोगही अनेक घातक पद्धतींनी केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानावर बंदी घातली जाऊ नये. तथापि, त्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी कठोर कायदे आणि कठोर शिक्षांची तरतूद करावी लागणार आहे, हे या व्हिडीओच्या प्रसंगावरुन स्पष्टपणे समोर येत आहे.