शिराळ्यात होणार 'जिवंत' नागपंचमी
शिराळा :
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर केवळ शैक्षणिक उद्देशासाठी शिराळा येथील २१ जणांना जिवंत नाग पकडण्याची परवानगी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने दिली आहे. सर्प संवर्धनाविषयी पारंपारिक ज्ञान प्रसारण होण्यासाठी काही अटींवर ही परवानगी मिळाली आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशीच ही परवानगी मिळाल्याने नागमंडळे आणि नागरिकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, आमदार सत्यजित देशमुख यांनी पत्रकार बैठक घेऊन केंद्र सरकारचे आभार मानले. जिवंत नागाची पूजा करणारे शिराळा हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बत्तीस शिराळा नागपंचमीदिवशी जिवंत नागाची पूजा करणारे गाव म्हणून जगप्रसिद्ध होते. नागपंचमीची यात्रा गावाचे वैशिष्ट्य होती. मात्र, न्यायालयाने जिवंत नागांच्या प्रदर्शनावर बंदी आणल्याने शिराळाकर नाराज झाले होते.
नागपंचमीदिवशी जिवंत नाग पकडण्याची आणि त्यांची पूजा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी राजकीय स्तरावरून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आमदार सत्यजित देशमुख यांनी यासाठी केंद्रशासनाकडे मागणी केली होती.
या पाठपुराव्याला यश येऊन नागपंचमीच्या पूर्वसंध्येला वन आणि पर्यावरण मंत्रालयाने काही अटी आणि शर्ती घालून २१ जणांना जिवंत नाग पकडण्याची परवानगी दिली आहे. फक्त ३१ जुलैअखेर ही परवानगी आहे. केवळ शैक्षणिक उद्देशासाठी व लोकांमध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारण होण्यासाठी ही परवानगी आहे. पकडलेल्या नागांना इजा न करता ते सुरक्षितपणे त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्याची अट आहे. या २१ जणांव्यतिरिक्त अन्य कोणालाही नाग पकडणे, त्यांचे प्रदर्शन करता येणार नसल्याचे वन मंत्रालयाच्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, आमदार देशमुख यांनी या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, २००२ पासून ही नागपंचमी न्यायालयाच्या बंधनात होती. मात्र गृहमंत्री अमित शहा, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नामुळे ही परवानगी मिळाली आहे. नागरिकांनी संयम बाळगावा. प्रशासनास सहकार्य करावे. विधानसभा निवडणुकीत नागपंचमीचा प्रश्न ऐरणीवर होता. गृहमंत्री शहा यांनी शब्द दिला होता. तो खरा केला आहे. आता आपण अटी व शर्ती यांना अधीन राहून नागाबाबत प्रबोधन करावे. अबालवृद्ध, महिला, नागरिक यांची मागणी पूर्ण झाली आहे. नागपंचमी पारंपरिक पद्धतीने सुरू व्हावी, यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आता शिराळा हे जागतिक स्तरावर धार्मिक पर्यटनाचे स्थळ म्हणून नावारूपास येईल, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी हणमंतराव पाटील, संपतराव देशमुख, रणजितसिंह नाईक, पृथ्विसिंग नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक, कुलदीप निकम, पै. अभिजित शेणेकर, सचिन नलवडे, विनोद कदम, सम्राट शिंदे, संभाजी नलवडे, अभिजित यादव उपस्थित होते. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करीत आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटण्यात आले.
केंद्रीय वन मंत्रालयाकडून मंजूरी
२१ जणांना जिवंत नाग पकडण्याची परवानगी
आमदार सत्यजित देशमुखांच्या पाठपुराव्याला यश
केवळ शैक्षणिक उद्देशासाठी नाग पकडण्याची अट