For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हृदयविदारक! पण पुढे काय?

06:07 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
हृदयविदारक  पण पुढे काय
Advertisement

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडात झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये अतिदक्षता शिशू चिकित्सा कक्षात लागलेल्या आगीमुळे 10 बालकांचा जळून मृत्यू झाला आहे. काही बालकं जखमी झाली आहेत. 18 बालकांवर उपचार करण्याची क्षमता असणाऱ्या या विभागात तब्बल 54 बालकं होती. अद्याप आठ मुले या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेली सापडलीच नाहीत. एक दिवसापासूनची प्रकृती गंभीर असणारी मुले ज्यांचे नामकरणसुद्धा न झालेल्या या मुलांच्या हाताला मातेच्या नावाची चिठ्ठी बांधली जाते. वाचवण्यासाठी धडपडीत ती चिठ्ठी सुटली. त्यामुळे अंत्यसंस्कार झाले ती मुले त्याच पालकांची होती का? हे सांगणे मुश्कील आहे. मृत आणि बेपत्ता मुलांच्या माता दवाखान्याच्या बाहेर उभे राहून आक्रोश करीत आहेत. त्यांना प्रशासन उत्तर काय देणार? याच वर्षाच्या प्रारंभीच जानेवारी महिन्यात या दवाखान्यात जगातील सर्वोत्तम सुविधा असणारा नवजात शिशू विभाग सुरू होईल अशा घोषणा डीनने केल्या होत्या. हा विभाग गेल्या दहा महिन्यात सुरू नाही. आता दुर्घटना घडल्यानंतर याच दवाखान्याच्या आवारात आणखी एक मोठा दवाखाना उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा नवा खुलासा प्रशासन करत आहे. पण आहे त्या दवाखान्याची व्यवस्था नीट लावता येत नसताना जगप्रसिद्ध व्यवस्था केल्याचा कांगावा करणारी यंत्रणा दोन्हीपैकी कुठल्यातरी एका वेळी किंवा दोन्ही वेळी खोटे बोलत आहे हे नक्की. दुर्घटनेनंतर सक्रिय झालेल्या वैद्यकीय पथकाने प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असे तातडीने जाहीर केले. मात्र जेव्हा प्रत्यक्षदर्शी पुढे आले तेव्हा ही आग ऑक्सिजन सिलेंडरची पाईप लावण्यासाठी दवाखान्यातील नर्सने आगपेटी पेटवून पाईप  तापवण्याचा प्रयत्न केल्याने लागली आणि क्षणार्धात जेथे पर्यंत ऑक्सिजन पसरत होता त्या संपूर्ण वॉर्डमध्ये एकाचवेळी आग पसरली अशी माहिती पुढे आली आहे. उपस्थित व्यक्तींनी, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मुलांना मिळेल त्या कपड्यात गुंडाळून बाहेर काढले. तरीही दहा बालकांचा मृत्यू झाला आणि 35 बालके अक्षरश: एका खिडकीतून बाहेर काढून प्रशासनाच्या हवाली करण्यात आली. अशी दुर्घटना देशातील कुठल्याही ठिकाणी घडू शकते. दुर्दैवाची बाब म्हणजे 2019 साली अग्निशमन यंत्रणा सुसज्ज करण्यात आली होती आणि त्याचा कालावधी उलटून गेला तरी ती तशीच पडून राहिल्याने जेव्हा खरोखर त्याची गरज होती त्या वेळेला आग आटोक्यात आणण्यासाठी या यंत्रणेचा काडीचाही उपयोग झाला नाही. मात्र तरीसुद्धा इथल्या डीनचे म्हणणे आहे की, जून महिन्यात या दवाखान्यात आगीचे मॉक ड्रिल करण्यात आले होते. त्यावेळी याच यंत्रणेच्या साह्याने आग आटोक्यात आली होती आणि वेळोवेळी या यंत्रणेची दुरुस्ती देखभाल करण्यात आली आहे! यात पुन्हा खोट्याचाच बोलबाला अधिक दिसतो. देशभर अशा दुर्घटना घडल्यानंतर दावे केले जातातच. त्या यंत्रणेच्या खराब होण्याची तारीख तिथे लटकवलेल्या सिलेंडरवर अजूनही आहे तशी आहे. धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस कोणाच्या पाठबळाने दाखवले जाते? उत्तर प्रदेशातच पाच-सहा वर्षांपूर्वी अशीच एक दुर्घटना घडून अनेक बालकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची आठवण देशाला झाल्याशिवाय राहिली नाही. या दुर्घटना कोणी जाणून बुजून घडवत नाहीत. मात्र ज्यांनी सावध राहायचे त्या यंत्रणा बेसावध राहिल्या की अशा घटनांना निमंत्रण मिळते आणि त्यानंतर माहिती घेताना एका मागून एक चुकांची मालिका उघडकीस येते. सावधान असणे आणि त्यासाठी नेमलेली यंत्रणा नेहमी सतर्क असणे हाच यावर उपाय आहे. वेळोवेळी यंत्रणा सज्ज केली तर अशा दुर्घटना घडत नाहीत. महाराणी झाशी म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे त्या राणी लक्ष्मीबाई यांचे झाशीच्या किल्ल्यापासून कुठलेही पुतळे पाहिले तर आपल्या बालकाला पाठीशी बांधून झाशीचा किल्ला ओलांडतानाच्या स्मृती जागवणाराच पुतळा उभा केलेला असतो. अशा लोकोत्तर स्त्राrच्या नावाने सुरू असणाऱ्या दवाखान्यामध्ये ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर एक्स या समाज माध्यमावर भारतातील सर्व मान्यवरांनी मृतांना श्रद्धांजली आणि त्यांच्या परिवारांप्रती संवेदना प्रकट केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल एक्स माध्यमावर दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना हृदयविदारक असल्याचे प्रत्येकाने म्हटले आहे. जखमींना किती मदत केली याच्या घोषणा आहेत. शिवाय आता इतर दवाखान्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून काळजी घेण्याचे आवाहनसुद्धा आहे. अलीकडच्या काळात देशातील कुठल्याही सरकारच्या आपत्तीला सामोरे जाण्याच्या तऱ्हा पाहिल्या तर याहून वेगळ्या नाहीत, हे दिसून येईल. प्रमुख नेत्याने आभासी माध्यमावर दु:ख व्यक्त करणे, मृताच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमीला पन्नास हजार मदतीची घोषणा करणे आणि संबंधितांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असे सांगत दुसऱ्या कार्यक्रमांमध्ये निघून जाणे अशा पद्धतीचा औपचारिकपणा नेत्यांच्या वर्तणुकीत वाढत चालला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्यांच्या राज्यात ही घटना घडली आहे त्यांना मृताच्या नातेवाईकांना भेटून सांत्वन करायला वेळ नाही. कारण, फुलपुर सारख्या लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक त्यांच्यासाठी दहा मृत बालकाहून महत्त्वाची आहे. शिवाय राज्याचे एक उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री असल्याने ते बघून घेतील अशी त्यांची धारणा दिसते. वास्तविक आक्रोश करणाऱ्या महिलांना आणि संपूर्ण कुटुंबाला आधार देण्यासाठी माणुसकीच्या नात्याने राज्याच्या प्रमुखांनी तिथे उपस्थित असणे अत्यंत गरजेचे होते. मात्र ज्या राज्यात दगडसुद्धा उभा केला तर तो निवडून येईल अशी स्थिती आहे, त्या राज्यात मुख्यमंत्री दुर्घटनेतील जनता सोडून निवडणुकीच्या प्रचारात विजयाचे चिन्ह उंचावत फिरत असतील तर ती संवेदनहीनताच म्हटली पाहिजे. भगवी वस्त्रs परिधान केलेल्या व्यक्तीला इतके असंवेदनशीलपणे वागताना पाहणे समाजाला जड जाते. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आणि संवेदना व्यक्त करणे समजू शकते. त्यांचे व्याप मोठे आहेत. मात्र मुख्यमंत्री हा त्या राज्याचा प्रमुख आहे आणि त्यांना जर वेळ मिळत नसेल तर अधूनमधून अशा दुर्घटना घडतच राहणार. देवच तिथल्या जनतेचे रक्षण करो.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.