झिम्बाम्बेतील लिटिल ‘बेयर ग्रिल्स’
जंगलात वन्यप्राण्यांदरम्यान राहिला जिवंत
डिस्कव्हरी चॅनेलचा कार्यक्रम मॅन व्हर्सेस वाइल्डमध्ये बेयर ग्रिल्सला प्रतिकूल स्थितीत जिवंत राहण्याचे धडे देताना पाहिले असेल. घनदाट जंगलांमध्ये प्राण्यांपासून कसे वाचायचे, तीव्र उन्हात पाण्याची व्यवस्था कशी करायची, वृक्षांपासून अन्न कसे मिळवायचे याचे कौशल्य बेयर ग्रिल्स टीव्ही स्क्रीनवर लोकांना शिकवत असतो.
भारतापासून हजारो मैल अंतरावरील झिम्बाम्बेत जंगलांमध्ये वसलेल्या एका गावात 7-8 वर्षांचा मुलगा राहत होता. त्याचे नाव टिनोटेंडा पुंडु होते, त्याने बेयर ग्रिल्सचे शो पाहिले नव्हते, परंतु स्वत:च्या छोट्या आयुष्यात जिवंत राहण्यासाठी उपयुक्त पद्धती आत्मसात केल्या होत्या.
टिनोटेंडा पुंडु उत्तर झिम्बाम्बेच्या एका गावात राहत होता. एक दिवस तो गावातून भटकून घनदाट जंगलांमध्ये पोहोचला. 8 वर्षांचा पुंडु पोहोचलेले जंगल प्रत्यक्षात सिंहांसाठीचे अभयारण्य होते, याचे नाव माटुसाडोना नॅशनल पार्क होते. सिंहांच्या कळपादरम्यान या 8 वर्षीय बालकाने जिवंत राहण्यासाठी केलेली धडपड आता जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
पुंडुचे गाव दुष्काळग्रस्त असून गावात पुंडुला पिण्याच्या पाण्यासाठी जमीन खोदण्याची पद्धत शिकविण्यात आली होती, पुंडुला ही पद्धत जंगलात उपयोगी पडली, त्याने जंगलात काठीच्या मदतीने नदीच्या काठावर खोदण्यास सुरुवात केली, त्यातून निघणारे पाणी पित तो जिवंत राहत होता.
पुंडु स्वत:च्या गावातून 27 डिसेंबर रोजी गायब झाला होता, तर दुसरीकडे ग्रामस्थ ढोल वाजवून त्याला शोधत होते. आवाज ऐकून पुंडु येईल अशी आशा त्यांना होती. परंतु ग्रामस्थांच्या पदरी अपयशच आले. 8 वर्षीय पुंडुं भटकत भटकत स्वत:च्या गावापासून 50 किलोमीटर अंतरावर पोहोचला होता. तर ग्रामस्थ त्याला नजीकच शोधत होते. पुंडु भूक लागल्यावर जंगली फळ खात होता, या फळाला झिम्बाम्बेत त्सवान्झा नावाने ओळखले जाते.
पुंडु उंच खडकांवर झोपायचा, जेणेकरून सिंह आणि अन्य प्राणी त्याच्यापर्यंत पोहोचू नयेत. 5 दिवसांनी टिनोटेंडाने पार्क रेंजरच्या कारचा आवाज ऐकला आणि त्या दिशेने धाव घेतली, परंतु तोपर्यंत कार निघून गेली होती. पण रेंजर परतल्याने तो त्यांना सापडला. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जेथे ड्रिप लावण्यात आले. इतक्या दीर्घ काळात तो धोकादायक भागात एकटाच राहिला. माटुसाडोना नॅशनल पार्क हे सिंह, बिबटे, हत्ती आणि अन्य वन्यप्राण्यांसाठी ओळखले जाते.