केएलईत मधुमेही रुग्णांवर लिथोट्रिप्सी शस्त्रक्रिया यशस्वी
बेळगाव : मधुमेही रुग्णांना दिलासा देणारी, गुडघ्याच्या खाली असलेल्या रक्तवाहिन्यांच्या आजाराबाबत गुडघ्याच्या खाली लिथोट्रिप्सी यशस्वीरित्या पूर्ण करून केएलई डॉ. प्र्रभाकर कोरे हॉस्पिटलने मोठी प्रगती केली असल्याची माहिती डॉ. अभिनंदन रुगे यांनी दिली. भारतात प्रथमच हॉस्पिटलच्या ‘न्यूरो अॅण्ड व्हॅस्क्युलर इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी’ विभागाने ही शस्त्रक्रिया केली आहे. अनेकदा रुग्णांना टाईप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा स्ट्रोक यामुळे त्रास होतो. स्ट्रोकमुळे मेंदूवर परिणाम होतो. रक्तदाबामुळे हृदयावर परिणाम होतो. अशावेळी मेंदूमध्ये व हृदयामध्ये स्टेन्ट बसविता येतो. मधुमेहामुळे पावलांवर परिणाम होऊ शकतो. मधुमेहावर योग्य असे उपचार झाले नाहीत तर पाय किंवा पाऊल काढण्याची वेळ येते. पण तेथे स्टेन्ट बसविता येत नाही.
मात्र, लिथोट्रिप्सी या शस्त्रक्रियेमुळे पाय आणि पाऊल आपण वाचवू शकतो. या शस्त्रक्रियेअंतर्गत गुडघ्याखालील रक्तवाहिन्यांच्या धमनीच्या भिंतीमध्ये कडक झालेले कॅल्शियम हळूहळू कमी होत जाऊन रक्तप्रवाह सुधारतो, अशी माहिती त्यांनी दिली. केएलई हॉस्पिटलमध्ये 58 वर्षीय व 55 वर्षीय रुग्णांवर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली असून दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. भारतात प्रथमच केएलई हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने ही लिथोट्रिप्सी शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान स्वीकारून ते यशस्वी केले आहे, असेही डॉ. रुगे यांनी स्पष्ट केले. डॉ. रुगे यांच्या समवेत डॉ. अभिमान बालोजी, डॉ. नवीन मुलीमनी, डॉ. इराण्णा हित्तलमनी, डॉ. बसवराज बिरादार, डॉ. चैतन्य कामत यांनी या शस्त्रक्रिया केल्या. याबद्दल चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.