कोणत्याही भाषेचे अक्षरज्ञान असले की तो ‘साक्षर’
साक्षरता अभियानासाठी निरक्षरांची संख्या शोधण्यासाठी मोहीम : भाषेची सक्ती नाही, शिक्षकांच्या कामात मात्र वाढ
बेळगाव : साक्षरता अभियानासाठी निरक्षरांची संख्या शोधण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. कोणत्याही भाषेचे अक्षरज्ञान असणाऱ्या व्यक्तीला साक्षर ठरविले जात आहे. यासाठी कोणत्याही भाषेची सक्ती राज्य सरकारने केलेली नाही. मराठीसह कन्नड, ऊर्दू, इंग्रजी, तमिळ यासह देशातील इतर सर्वच भाषांचे अक्षरज्ञान असणाऱ्या व्यक्तीला साक्षर ठरविण्यात येत आहे. त्यामुळे निरक्षर व्यक्ती शोधण्याचे मोठे काम शिक्षकांना करावे लागत आहे.
मागील काही महिन्यांपासून निरक्षरांची संख्या जाणून घेण्यासाठी जिल्हा पंचायतीमार्फत शिक्षकांकरवी सर्वेक्षण केले जात होते. सध्या शहरात सर्वच साक्षर असल्यामुळे कुठे तरी क्वचितच निरक्षरांची संख्या आढळून येत आहे. शिक्षकांना निरक्षरांची माहिती उल्लास अॅपद्वारे भरावयाची आहे. या अॅपमध्ये केवळ नाव नाही तर आधारकार्ड क्रमांकही द्यावा लागत असल्याने शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहेत. शाळेत शिकवायचे की निरक्षरांचा सर्व्हे करण्यासाठी फिरायचे? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.
वर्षभरापूर्वी राज्य सरकारने निरक्षरांबाबत एक आदेश बजावला होता. कर्नाटकात राहणाऱ्यांना किमान प्राथमिक कन्नड भाषा यावी, यासाठी ज्या व्यक्तीला कन्नड येत नाही तो निरक्षर ठरविला जाणार होता.परंतु राज्यात इतर भाषिक मोठ्या संख्येने असल्याने याला कडाडून विरोध झाला. वकिली पेशातील काही जणांनी राज्य सरकारला धारेवर धरल्याने हा निर्णय मागे घेत कोणत्याही भाषेचे अक्षरज्ञान असले तर तो साक्षर, असा बदल केला. त्यामुळे सध्या त्या व्यक्तीला मराठी येते तो साक्षर ठरविला जात आहे.
साक्षरतेसाठी कोणत्याही एका भाषेची सक्ती नाही
शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार साक्षरतेसाठी कोणत्याही एका भाषेची सक्ती करण्यात आलेली नाही. केवळ निरक्षरांची संख्या शोधण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. कोणत्याही भाषेचे अक्षरज्ञान असेल तर साक्षर ठरविले जात आहे. अमूकच भाषा आली पाहिजे, अशी साक्षरतेसाठी कोणतीही सक्ती करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक शाळेला निरक्षर शोधण्यासाठी टार्गेट
शहरातील निरक्षर शोधण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली आहे. शहरात निरक्षरांची संख्या अधिक असल्याचे काही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शिक्षकांना या कामाला जुंपले आहे. प्रत्येक शाळेला निरक्षर शोधण्यासाठी टार्गेट देण्यात आले आहे. एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीला अथवा सेल्स मॅनेजरला बिझनेस वाढविण्यासाठी ज्याप्रकारे टार्गेट दिले जाते, तसेच टार्गेट देण्यात आल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.