तुका म्हणे कळे परि होताती आंधळे
मालवणच्या घटनेनंतर साहित्यिक प्रवीण बांदेकर यांची प्रतिक्रिया
सावंतवाडी । प्रतिनिधी
कालची मालवणची घटना विसरून किंवा अगदी सहजपणे नजरेआड करून सिंधुदुर्गातले लोक नेहमीच्याच उत्साहाने दहीहंडी फोडतायत. नेत्यांची मोठमोठी होर्डिंग्ज, कानठळ्या बसवणारे आवाज, नाचगाणी, लाखा लाखाच्या हंड्या... सगळं तेच. हे विस्मरण निव्वळ गतिमान काळामुळे होतंय म्हणायचं की झिंग आणणा-या भवतालामुळे आलेलं बथ्थडपण आहे हे? कुणासाठीच, कशासाठीच आपण थांबू शकत नाही की काहीही थांबवू शकत नाही. थांबवणं शक्य नसेल, समजू शकतो, पण फारशी खंतही जाणवत नाही, हे भयंकर आहे, अशी प्रतिक्रिया साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी दिली आहे .म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो, म्हणतो आपण. पण तो कधीचाच सोकावला आहे, खरं तर. सोकावलेल्या काळाला आयभैन कुणीच नसतं. इतिहास नि वारसा वगैरे तर फारच दूरच्या गोष्टी झाल्या. त्याला आता पुरती धानाधिस्पटच करायची असेल, नि आपल्याला विरोधात काही ब्रसुद्धा उच्चारायचा नसेल, तर मग कठीणच आहे. किंवा मग -तुका म्हणे कळे परि होताती अंधळे, हेच खरं असावं कदाचित, असेही त्यांनी म्हटले आहे.