आजगावातील "त्या" धोकादायक स्पीडब्रेकरवर दुचाकीवरून पडून महिला जखमी
स्पीडब्रेकरवर पांढरे पट्टे रंगवण्याची मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिक संतप्त
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी शिरोडा मार्गावरील आजगाव येथील सेंट झेवियर्स हायस्कूल येथे असलेल्या स्पीडब्रेकरवर पांढरे पट्टे नसल्याने शिरोडा बाजारपेठच्या दिशेने जाताना दुचाकीवर मागे बसलेली एक जेष्ठ महीला खाली पडून जखमी झाली, संबधित महिला तिच्या पतीसह रेडी येथे जात होती.घटनास्थळी आजगावातील नागरिकांनी धाव घेत पतीसह त्या महिलेला मदत करुन दवाखान्यात नेले.आजगावातील सेंट झेवियर्स हायस्कूल समोर अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या "त्या" स्पीडब्रेकवर पांढरे पट्टे रंगवण्याची मागणी स्थानिक नागरीकांनी वारंवार करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने नागरीकांनी संतप्त व्यक्त केला. "त्या" स्पीडब्रेकवर यापूर्वीही अश्याच प्रकारचे अपघात वारंवार होऊन वाहनचालक जखमी झाले आहेत. आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाला याची जाग येऊन तातडीने "त्या" स्पीडब्रेकवर पांढरे पट्टे रंगवून सुचनाफलक लावण्यात यावा अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली.