बेळगुंदी साहित्य संमेलनात साहित्यिकांची मांदियाळी
उद्या चार सत्रात होणार साहित्य संमेलन : महाराष्ट्र-विविध भागातील साहित्यिक उपस्थित राहणार
वार्ताहर/किणये
बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशे साहित्य अकादमीतर्फे रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी बेळगुंदी येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलन चार सत्रात होणार आहे. संमेलनामध्ये महाराष्ट्र व विविध भागातील साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवयित्री सुजाता पेंडसे उपस्थित राहणार आहेत. संमेलनात साहित्यिकांची मांदियाळी लाभणार आहे. या संमेलनातील काही साहित्यिकांचा थोडक्यात परिचय.
सुजाता पेंडसे
कोल्हापूर येथील सुजाता पेंडसे या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष आहेत. त्या गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारितेमध्ये आहेत. त्यांनी विविध मासिके, वृत्तपत्र, दिवाळी अंक, कथा, कविता, ललीत असे लेखन केले आहे. शिशीर फुले, काव्यसंग्रह, जिवंत हुतात्मा, आरसा, रीतभात आदी पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच पदमबंध हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्रातील यशवंत पुरस्कार, डॉ. न. ना. देशपांडे स्म़ती गौरव, डॉ. यादव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
आमदार शिवाजीराव पाटील
चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील हे संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांनी आपल्या कामकाजाची सुरुवात बांधकाम व वाहतूक व्यवसायाद्वारे केली. चंदगड भागातील सामाजिक कार्य अगदी तळमळीने करणारे नेते आहेत. त्यांचे शिक्षण बीए झाले आहे. सर्वसामान्य लोकांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत.
भारती सुतार
![]()
बेळगुंदी गावच्या सुकन्या भारती सुतार या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत. त्या गडहिंग्लज येथील विद्यामंदिराच्या अध्यापिका आहेत. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविले आहे. त्यांनी भारतरत्न सचित तेंडुलकर यांची भेट घेतली आहे. त्यांना क्रीडा क्षेत्रातही विशेष पुरस्कार मिळाले आहेत.
डॉ. स्मिता पाटील-मोहोळ
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात सोलापूर येथील डॉ. स्मिता पाटील व डॉ. मनिषा नेसरकर यांचे व्याख्यान होणार आहे. स्मिता पाटील यांची 5 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 1100 हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यामुळे त्यांचे व्याख्यान महिलांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
चित्रा क्षीरसागर
दुपारी 3 वाजता कवी संमेलन होणार आहे. अध्यक्षा म्हणून गोवा येथील कवयित्री चित्रा क्षीरसागर या आहेत. संमेलनात शशिकला गुंजाळ (उस्मानाबाद), अलका सपकाळ (सोलापूर), प्रकाश क्षीरसागर (गोवा, दमाताई मित्रगोत्री (गोवा), उमेश शिरगुप्पे (गोवा) यांचा सहभाग राहणार आहे. चित्रा क्षीरसागर यांच्या अनेक कविता गाजल्या आहेत. त्यांना गोवा व महाराष्ट्रातील विविध पुरस्कार मिळाले आहेत.
विद्या पाटील
चौथ्या सत्रात आम्ही जिजाऊ बोलतोय हा एकपात्री प्रयोग विद्या पाटील (टिळे) या सादर करणार आहेत. त्यानंतर गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी अहिल्यानगर येथील गोविंद शिंदे महाराज यांचे कीर्तन होणार आहे.