देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान गरजेचे
गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांचे प्रतिपादन ; सावंतवाडी तालुकास्तरीय उल्लास मेळावा संपन्न
सावंतवाडी । प्रतिनिधी
आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला अक्षराची ओळख असणे गरजेचे आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान गरजेचे आहे . प्रत्येकाला साक्षर करणे हे आपले कर्तव्य आहे . केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमात सावंतवाडी तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. यातून नव साक्षरांचाही आत्मविश्वास निश्चितच वाढेल. त्यांच्यातील न्यूनगंड कमी कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल. केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमात शिक्षण व्यवस्थेसह नागरिकांनीही सहभाग दर्शवून तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी केले. केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय उल्लास मेळावा वि.स.खांडेकर हायस्कूल सावंतवाडी येथे झाला. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ . बोडके बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर विषय तज्ञ तथा साक्षरता अभियान तालुका समन्वयक प्रज्ञा गावडे,शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकुर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकुर, वि स खांडेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक राजाराम पवार उपस्थित होते.तालुक्यातील निवडक केंद्रांने शैक्षणिक साहित्य बनवून स्टॉल प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. आर्थिक साक्षरता, माता व बालकांचे संगोपन, निगा, असासाक्षरांना साक्षर करण्याचे विविध मार्ग , आपत्ती व्यवस्थापन, विविध व्यवसायासाठी कौशल्य विकास अशा विविध विषयावर आधारित भित्तिपत्रके , चार्ट, खेळातून मनोरंजन , ई लर्निंग साहित्य अशा विविध स्टॉलमध्ये उत्कृष्टरित्या सादर करण्यात आल्या. साक्षरता अभियानात प्रभावी काम करणारे विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका प्रा.सुषमा मांजरेकर - गोडकर व चौकुळ शाळेचे शिक्षक सूर्यवंशी यांचा खास गौरव यावेळी करण्यात आला. तसेच स्वयंसेवक संतोष गोडकर यांनीही ही गौरविण्यात आले. नव साक्षर लीलावती मेघश्याम आरोलकर( दांडेली )यांनी मालवणी भाषेतून आपले साक्षरतेबद्दलचे अनुभव व्यक्त केले . साक्षर झाल्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास खूप वाढला. मला साक्षर बनवण्यासाठी सुषमा मांजरेकर मॅडम आणि संतोष गोडकर यांनी खूप मेहनत घेतली , असे त्या म्हणाल्या. शैक्षणिक साहित्य स्टॉलची पाहणी यावेळी सर्व मान्यवरांनी केली. उल्लास मेळाव्यात सहभागी शिक्षकांनी अत्यंत कलात्मक पद्धतीने शिक्षणाचे महत्त्व विविध कलाकृतीतून मांडले .त्यामुळे निरक्षर नव साक्षरता शिक्षणाचे महत्त्व पटण्यास निश्चितच मदत होईल, असेही गटशिक्षणाधिकारी बोडके म्हणाल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी केले. यावेळी काव्या साळवी, प्रज्ञा मातोंडकर , प्रतिभा सातार्डेकर, बांदेकर आदी शिक्षक उपस्थित होते.